हिजाब चेहऱ्यावरून काढा, अन् दहा वर्षे तुरुंगात सडा | पुढारी

हिजाब चेहऱ्यावरून काढा, अन् दहा वर्षे तुरुंगात सडा

तेहरान : हिजाबची परंपरा न पाळणे आता इराणमध्ये महिलांना भलतेच महागात पडणार आहे. तेथील सरकारने यासंदर्भात कडक कायदा केला असून त्यानुसार ज्या महिला योग्यप्रकारे हिजाब परिधान करणार नाहीत, त्यांना किमान दहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे महिलावर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, सरकार आपल्या म्हणण्यावर ठाम आहे.

हिजाबचे पावित्र्य जपण्याबाबत इराणच्या संसदेने याविषयीच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा कायदा लागू केला जाणार आहे. पालक परिषदेने विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. इराणमधील महिलांनी देशात हिजाबविरोधात मोठे आंदोलन उभे केले आहे. २२ वर्षीय महेसा अमिनी हिला इस्लामिक ड्रेस कोडचे पालन न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस कोठडीतच तिचा गूढ मृत्यू झाला आणि देशात जनक्षोभ उसळला. मात्र, एवढ्या घटना घडूनही इराणच्या सरकार महिलांची गळचेपी करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button