Nandurbar ZP: काँग्रेस-शिवसेनेची सत्ता जैसे थे राहणार, पोटनिवडणूक निकालानंतरचे चित्र 
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar ZP: काँग्रेस-शिवसेनेची सत्ता जैसे थे राहणार

रणजित गायकवाड

Nandurbar ZP : येथील जिल्हा परिषदेच्या ११ गटात आणि पंचायत समितीच्या १४ गणात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता देखील काँग्रेस आणि शिवसेनेला राखता आली आहे. पोटनिवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले.

दीड वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा भाजपा २३, काँग्रेस २३, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ होते. तेव्हा शिवसेना आणि काँग्रेस मिळून ३० संख्या बाळा पूर्ण होत असल्याने त्यांनी दोघं मिळून सत्ता स्थापन केली व राष्ट्रवादीचे तीन सदस्य मात्र भाजपा सोबत राहिले होते. आता ( Nandurbar ZP ) जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे व १४ गणांचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर भाजपाच्या ७ जागा कमी होऊन ते १६ वर आले होते. काँग्रेसच्या २ आणि शिवसेनेच्या २ जागा घटून ते अनुक्रमे २१ आणि ५ वर आले होते.

परिणामी आपले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील होता. हे करताना भारतीय जनता पार्टीला म्हणजे पर्यायाने माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांना एकटे पाडून लढण्याची रणनीती काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीने अवलंबली. त्यात यश मिळाल्याने भारतीय जनता पार्टीचला ४ चार गटातील विजयावर समाधान मानावे लागले. त्यांच्या तीन जागा हातून गेल्या. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे संख्याबळ पूर्वीपेक्षा एकेक जागेने वाढले.

निकाला अंती जिल्हा परिषदेतील काँग्रेस २४ शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी तीन असे संख्याबळ बनले. हे तीनही घटक पक्ष एकत्र आल्यास मजबूत आघाडी जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पक्षातील प्रत्येक प्रमुख नेत्यांच्या घरातील प्रमुख सदस्य रिंगणात उतरवला गेल्याने ही पोटनिवडणूक आणखीन लक्षवेधी बनली होती. जिल्हा पालक मंत्री ॲड. के. सी.पाडवी हे भगीनी गीता पाडवी यांच्यासाठी, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे कन्या डॉ. सुप्रिया गावित यांच्यासाठी, खासदार डॉ. हिना गावित या चुलत भाऊ पंकज गावित यांच्यासाठी, शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पूत्र ॲड. राम रघुवंशी यांच्यासाठी तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल रावल व दीपक पाटील हे आपापल्या सौभाग्यवतींसाठी प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार करीत होते.

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी खापर गटातून विजयी झाल्या. अक्कल्कुवा गटात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी यांना काँग्रेसच्या सुरया मकरानी यांनी पराभूत केले. कोपर्ली गटातून ३००० मतांचे अधिक्य मिळवून ॲड. राम रघुवंशी विजयी झाले आहेत. त्यांनी उपाध्यक्ष पदावरून सुरु केलेला राजकीय प्रवास आता पुन्हा सुरु राहणार आहे. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या घरातील चौथा सदस्य म्हणजे डॉ. सुप्रिया गावित यांचे या निमित्ताने राजकारणात पदार्पण झाले आहे. कोळदा गटातून १३६९ चे मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. मात्र डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना राम रघुवंशी यांच्या समोर पराभव पत्करावा लागला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT