

न्याय मिळण्यास विलंब हा न्यायास नकार, असे मानले जाते. मात्र जयपूरमधील बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा ( 'पोक्सो ) न्यायालयाने ( Pocso Court ) बलात्कार खटल्याची सुनावणी चार दिवसांमध्ये पूर्ण केली. पाचव्या दिवशी बलात्कार प्रकरणातील नराधमास २० वर्ष तुरुंगवास आणि २ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावत जलद न्यायदानाचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
जयपूरच्या कोटखवडा परिसरात २६ सप्टेंबर रोजी कमलेश मीणा याने ९ वर्षीय मुलींवर अत्याचार केला. यानंतर तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणाची माहिती देताना जयपूर पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, २७ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी १५० पोलिस कर्मचार्यांचे एक पथक तैनात करण्यात आले. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस कर्मचार्यांना तपासाची जबाबदारी पार पाडली. २७ सप्टेंबरलाच दुपारी १२ वाजता कमलेश मीणा याला अटक करण्यात आली. पाेलिसांनी याच दिवशी सलग पाच तासांमध्ये याप्रकरणाचा तपास पूर्ण केला. यानंतर पोक्सो न्यायालयात ( Pocso Court ) दोषारोपपत्रही दाखल केले.
कोटखवडा पोलिस ठाण्याचे अधिकारी जगदीश यांनी २७ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता जयपुरच्या पोक्सो न्यायालयात ( Pocso Court ) दोषारोपपत्र दाखल केले. २८ सप्टेंबरपासून या खटल्याची सुनावणी झाली. पुढील ४ दिवसांमध्ये १९ साक्षीदार तपासण्यात आले होते.
पीडित मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पीडित मुलीचा जबाब व्हिडिओ कॉन्फसिंगव्दारे घेण्यात आला. चार दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करुन पाचव्या दिवशी पोक्सो न्यायालयाने ( Pocso Court Jaipur ) आरोपी कमलेश मीणा याला २० वर्ष तुरुंगवास आणि २ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या ऐतिहासिक निकालाचे स्वागत करताना राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, चुकीचे कृत्य करणार्याला अशीच शिक्षा मिळेल. राज्यस्थान सरकार महिलांच्या पाठीशी आहे.