श्रीरामपुरात महायुती आणि महाविकास आघाडीतही अखेर मिठाचा खडा पडलाच. दोन्ही शिवसेनांना जागा वाटपात अपमानाची जाणीव झाल्याने, त्यांनी आघाडी-महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार दिले. त्यामुळे आता महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी, तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे समीकरण तयार झाले आहे. दोन्ही शिवसेनेने स्वबळावर दंड थोपटल्याने श्रीरामपुरात चुरस वाढली आहे.
श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून महायुतीचा घोळ सुरू होता. तो काल सकाळपर्यंत सुरूच होता. काल सकाळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा केली.
भाजपच मोठा भाऊ
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी उपस्थित होते. नगराध्यक्ष पद भाजपकडेच ठेवण्यात येऊन उमेदवार म्हणून श्रीनिवास बिहाणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक पदासाठी जागावाटप ठरविण्यात आले. भाजपला 22, तर राष्ट्रवादीला 12 जागांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भाजपने आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.
अनुराधा आदिक शर्यतीतून बाद
डॉ. सुजय विखे यांनी प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांबरोबर एकेक करून चर्चा केली व प्रभागातील उमेदवार निश्चित करण्यात येऊन त्यांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले. काल दुपारी 3 वाजेपर्यंत भाजप व राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या स्टँडिंग नगराध्यक्ष म्हणून पहिला हक्क असणाऱ्या अनुराधा आदिक यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि प्रभाग 3 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चित्तेंनी बेग, मुरकुटेंना दिल्या 12 जागा
शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासून इच्छुक असलेले प्रकाश चित्ते यांनी रविवारी पक्षाचे एबी फॉर्म आणले. त्यात सागर बेग यांना 9 जागा, तर मुरकुटे यांना 3 जागा यासह चित्ते यांनी 34 उमेदवारांचे अर्ज भरून घेतले. शिवसेनेकडून दीपाली चित्ते व प्रकाश चित्ते या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
छल्लारे, धालपे यांचा भाजपमध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत नुकतेच काँग्रेस पक्षात गेलेले ‘मर्चंट्स’चे संचालक दत्तात्रय धालपे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोघांचेही स्वागत केले. विखे पाटील यांनीच छल्लारे यांची प्रभाग 15 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.
महायुतीत भाजपला 22, तर राष्ट्रवादीला 12 जागा
मविआत काँग्रेसचा वरचष्मा; सर्व जागा पंजा चिन्हावर
प्रकाश चित्ते, अशोक थोरे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार
राष्ट्रवादीच्या हक्काची नगराध्यक्षपदाची जागा भाजपकडे
आदिकांचा पत्ता कट; श्रीनिवास बिहाणींना उमेदवारी
अनुराधा आदिक आता नगरसेवक पदासाठी रिंगणात
शरद पवारांची राष्ट्रवादीही ‘पंजा’वर लढणार !
जागावाटपात काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बोटावर मोजण्याइतक्या जागा दिल्या. शिवाय, त्यादेखील पंजा चिन्हावर लढण्याची अट घातली. ती पवार गटाने मान्य केली आहे. त्यामुळे मविआच्या सर्व जागा पंजा चिन्हावर लढविल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी दिग्गज मैदानात
श्रीरामपूर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून करण ससाणे, भाजपकडून श्रीनिवास बिहाणी, शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते, उबाठा सेनेकडून अशोक थोरे, तर सपाकडून जोएब शेख अशी पंचरंगी लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
अखेरच्या क्षणी आरपीआयला जागा सोडण्याची अडचण
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रिपाइंला दोन जागा देण्याचे कबूल केले होते. जनसेवा कार्यालयात प्राजक्ता त्रिभुवन (त्रिभुवन यांची पुतणी) आणि विजय पवार यांचे अर्जही भरून घेतले होते. मात्र, अखेरच्या क्षणी भाजप-राष्ट्रवादी युती झाल्याने संबंधित जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. हा रिपब्लिकन पक्षावर झालेला मोठा अन्याय असल्याचे त्रिभुवन म्हणाले.