

नगर: रविवारी या सुटीच्या दिवशी देखील बारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी 37 तर नगरसेवकपदासाठी 468 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (दि. 17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास मुभा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायत आदी पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यासाठी 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन केल्यामुळे अर्ज दाखल करणार्यांची संख्या रोडावली होती. ऑनलाईन अणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तसेच शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीदेखील स्वीकारण्यात येणार असल्याचे राज्य निवडठणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळेच अर्ज दाखल होण्यास वेग आला आहे.
रविवारी (दि. 16) एकूण 505 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये नगराध्यक्षपदाच्या 37 अर्जांचा समावेश आहे. सर्वाधिक शेवगाव पालिकेचे 8, नेवासा नगरपंचायतीसाठी 5 अर्ज दाखल झाले. संगमनेर व देवळाली प्रवरासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.
गेल्या सात दिवसांत 811 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 68 तर नगरसेवकपदासाठीच्या 743 अर्जाचा समावेश आहे. सोमवारी (दि.17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे.