

नगर तालुका: नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटातील जंगलातील झाडाच्या खोडामध्ये अडकलेल्या 12 फुटी अजगराला जीवदान देण्यात आले आहे. वनविभागाच्या सहकार्याने पत्रकार शशिकांत पवार यांच्या पुढाकारातून अडकलेल्या अजगराची मुक्तता करण्यात आली. सदर घटना शनिवारी (दि. 14) घडली.
इमामपूर घाटामधील जंगलात झाडाच्या खोडामध्ये अजगर अडकल्याची माहिती महामार्गावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आली. प्रयत्न करूनही अजगराला बाहेर पडता येत नव्हते. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी पत्रकार शशिकांत पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. बघ्यांची झालेली गर्दी यामुळे अजगराला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वनकर्मचारी संजय सरोदे यांनी मोठी काळजी घेतली.
पवार यांनी खोल दरीमध्ये उतरत वनकर्मचारी संजय सरोदे, संभाजी तोडमल, प्रणव पवार यांच्या मदतीने सदर अजगरास अडकलेल्या जागेवरून मुक्त करून जंगलात सोडले. सदरचा साप अजगरच असल्याची खात्री वनरक्षक मनेष जाधव यांनी दिली. अजगर हा बिनविषारी साप असून शेतकऱ्यांचा मित्र आहे. तसेच सर्व साप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा बाळगू नयेत, असे आवाहन वनविभागाने केले.
हा अजगर 12 फूट लांबीचे होते. अजगर तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी साप हे बिनविषारी असतात. घोणस, नाग, फुरसे, मन्यार या चार जातीचे साप विषारी असतात. काही साप निमविषारी आढळतात. सापाबद्दल ग्रामीण भागात आजही खूप अंधश्रद्धा आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापांना मारू नये असे आवाहन पवार यांनी केले.
सर्प हे उंदीर, घुस, तसेच शेतीच्या पिकासाठी त्रासदायक ठरणाऱ्या कीटकांना खातात. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असतो. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे. सापाबद्दल असलेल्या अंधश्रद्धा दूर होणे देखील गरजेचे आहे.
प्रणव पवार वनमित्र, चापेवाडी