

संगमनेर
आमदार तांबेंच्या हाती नेतृत्व
संगमनेर सेवा समितीचा पर्याय
डॉ. मैथिली तांबेंचा राजकारणात प्रवेश
श्रीरामपूर
दोन्ही शिवसेना स्वबळावर
अनुराधा आदिक नगरसेवक पदासाठी
शरद पवारांची राष्ट्रवादीही ‘पंजा’वर
नेवासा
शंकरराव गडाखांच्या ‘क्रांतिकारी’
निर्णयाने काँग्रेसकडे मविआचे नेतृत्व
महायुतीच्या उमेदवारीवरून सस्पेन्स
जामखेड
महायुतीचे तिन्ही पक्ष स्वबळावर
सुनीता राळेभात की प्रांजली
चिंतामणी, भाजपचा निर्णय ऐनवेळी
कोपरगाव
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी,
शिवसेनेचा स्वबळावर
विजय वहाडणे पुन्हा अपक्ष रिंगणात
संधान, कोयटेंची टाईटफाईट
श्रीगोंदा
भाजप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी,
महाविकास आघाडीचा ‘शड्डू’
महाविकास आघडी एकसंघ
महायुतीत बिघाडी
शेवगाव
भाजपचे प्रदेश पदाधिकारी मुंडेंच्या
हाती ‘धनुष्य बाण’
दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदे सेनेत चौरंगी लढत
पाथर्डी
दोन्ही राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
शिवसेना उबाठाच्या उमेदवारीने शरद
पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
‘आप’नेही घेतली उडी
शिर्डी
महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स
शेवटच्या दिवशी संपला
जयश्री थोरात नगराध्यक्षपदासाठी...
राष्ट्रवादीतर्फे दीपक गोंदकर लढणार
राहाता
महायुतीतर्फे डॉ. स्वाधीन गाडेकर यांना उमेदवारी
शहर विकास आघाडीतर्फे धनंजय
गाडेकर रिंगणात
देवळाली प्रवरा
काँग्रेस-भाजप-शिसेनेत तिरंगी सामना
अजित पवारांची राष्ट्रवादी दुभंगली
(आधे इधर, आधे उधर)
गणेश भांड यांची बंडखोरी
राहुरी
अखेर चाचा-प्राजक्त तनपुरे एकत्र
शिंदेंची शिवसेना, भाजप स्वतंत्र
अरुण तनपुरे पुतणे प्राजक्तच्या पाठीशी
नगर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ज्या संगमनेरकडे पाहिले जाते, त्याच मतदारसंघातून काँग्रेसचा ‘पंजा’ हद्दपार झाल्याचे आज स्पष्ट झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती संगमनेरचे नेतृत्व सोपविण्यात आले असून त्यांनी ‘हात’ बाजूला करत ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. संगमनेरच्या सत्तेसाठी पुन्हा एकदा खताळ-तांबे असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.
संगमनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी आ. तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या विरोधात आ. अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्णा संदीप खताळ यांनी धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे.
कोपरगावमध्ये महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांनी भाजपडून पराग संधान, आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीकडून काका कोयटे, शिवसेना (उबाठा) सपना भारत मोरे आणि शिवसेना (शिंदे) राजेंद्र झावरे यांच्यासह विजय वहाडणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
श्रीरामपूरमध्ये महाविकास आघाडी व महायुतीतून दोन्ही शिवसेना बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) युती झाली असून, काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. उबाठा सेनेने अशोक थोरे आणि शिंदे सेनेने प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
राहुरीत शिंदे सेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. विकास आघाडीकडून इच्छुक असलेले सुनील पवार यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. चाचा तनपुरे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत.
देवळालीत शिंदे शिवसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजप एकाकी पडले. उमेदवारी डावलल्याने अजित पवारांचे काही समर्थक महाविकास आघाडीकडे गेले. भाजप विरोधात मोट बांधण्यात महाविकास आघाडीला यश आले. गणेश भांड यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे.
श्रीगोंद्यात महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असून महाविकास आघाडी एकसंघ राहिली. आघाडीचे नेतृत्व बाबासाहेब भोस यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्या सूनबाई गौरी यांना महाविकास आघाडीने काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी भाजपकडून सुनीता खेतमाळीस, शिंदे सेनेचे शुभांगी पोटे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्योती खेडकर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत आहेत. श्रीगोंद्यात चौरंगी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले.
शेवगावमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आहे. आ. मोनिका राजळे यांनी रत्नमाला महेश फलके यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माया अरुण मुंडे यांनी ‘धनुष्य’ उचलले. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सवता सभा मांडत विद्या अरुण लांडे यांना राष्ट्रवादीची (अजित पवार) उमेदवारी दिली. महाविकास आघाडी टिकविण्यात ॲड. प्रताप ढाकणे यांना यश आल्याने परवीन एजाज काझी यांना राष्ट्रवादीची (शरद पवार) उमेदवारी मिळाली. महेश फलके हे भाजप तालुकाध्यक्ष असून अरुण मुंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. भाजपचे दोन स्थानिक नेते नगराध्यक्षपदासाठी आमने-सामने ठाकले आहेत.
पाथर्डीत महायुती व महाविकास आघाडीतून दोन्ही राष्ट्रवादी बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून अभय आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी (एपी) संजय भागवत, राष्ट्रवादी (एसपी) कडून बंडू बोरुडे, शिवसेनेचे (उबाठा) सोमनाथ बोरुडे यांच्यासह आम आदमीकडून नागेश लोटके हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
जामखेडमध्ये भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दंड थोपटले आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आ. रोहित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे.
नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाखांनी ‘क्रांतिकारी’चा निर्णय घेताच काँग्रेसने महाविकास आघाडीची धुरा हाती घेतली. अल्ताफ पठाण यांनी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून शिवसेनेने डॉ. करणसिंह घुले की भाजपचे शंकरराव लोखंडे यांच्यात पेच निर्माण झाला आहे.
राहाता नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी महायुतीतर्फे डॉ. स्वाधीन गाडेकर यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीने माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर यांना रिंगणात उतरविले आहे. या पदासाठी 9 उमेदवारी अर्ज आले असले तरी गाडेकर-गाडेकर ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.