

पाथर्डी: मोहटा देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत त्यांना पदावरून हकालपट्टीची मागणी सरपंच मनीषा पालवे, उपसरपंच अविनाश फुंदे, सेवा सोसायटीच्या अध्यक्षा सुलोचना दहिफळे, माजी विश्वस्त चंद्रकांत दहिफळे, भीमराव पालवे व वकील बाबासाहेब फुंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
विश्वस्त निवड प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून ग्रामस्थांनी मोठा आक्षेप घेतल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून, अंतिम निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्रामस्थविरुद्ध देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा संघर्ष अधिक पेटणार आहे. मोहटा ग्रामस्थ व देवस्थान प्रशासनातील वाद दिवसेंदिवस चिघळत असून, विश्वस्त निवड प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरपंच मनीषा पालवे म्हणाल्या, गावची सरपंच असताना माझा अर्ज नामंजूर करण्यात आला. गावातून एकूण 89 अर्ज आले असताना केवळ 18 अर्ज मंजूर करण्यात आले. अर्ज पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती. उपसरपंच अविनाश फुंदे यांनीही भणगे यांच्यावर गैरकारभाराचा आरोप करीत सांगितले की, एका महिलेने पतीचा उत्पन्न दाखला दिल्याने तिचा अर्ज बाद करण्यात आला. अशा किरकोळ कारणांवर अर्ज फेटाळले जात आहेत.
माजी विश्वस्त भीमराव पालवे म्हणाले, देवस्थानच्या घटनेत विश्वस्त निवडीसंदर्भात फक्त सहा अटी आहेत. मात्र, भणगे यांनी अतिरिक्त अटी लादत चुकीच्या पद्धतीने जाहिरात दिली. त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या कामकाजावर ठपका ठेवला होता, तरीही कारवाई करण्यात आली नाही. दानपेटी निधीचा योग्य वापर होत नाही. मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यात भणगे आघाडीवर आहेत. देवीगडावर बसवलेल्या पायऱ्यांवर लाखो रुपये खर्च करून तो पैसा वाया घालवला.मोहटा गावाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली. विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांमध्ये जाणूनबुजून दुही निर्माण केली जात आहे. ॲड़ बासाहेब फुंदे म्हणाले,या सर्व प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. भणगे यांची बदली तातडीने करणे आवश्यक आहे.
भणगे यांनी आरोप फेटाळले
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, विश्वस्त निवड प्रक्रिया ही जिल्हा न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. या प्रक्रियेत माझा कोणताही हस्तक्षेप नाही. अर्ज पात्र ,अपात्र का ठरले, याची माहिती वेबसाईटवर देिली आहे. पात्र ठरलेल्या अर्जदारांपैकी कोणताही माझ्या जवळचा नाही. सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ शासनाच्या नियमांनुसार होते. देवीगडावरील पायऱ्या नवरात्र उत्सवात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बसवण्यात आल्या होत्या.देवस्थानची सर्व विकासकामे नियमांनुसार निविदा प्रक्रियेनेच केली जातात.त्रिसदस्यीय समितीने माझ्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.दानपेटी निधीच्या वापराबाबत सर्व कामांचे नियमित ऑडिट केले जाते.
दरम्यान, मोहटा देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की निवड प्रक्रियेत मनमानी, गैरपारदर्शकता आणि पक्षपाती निर्णय घेण्यात आले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाल्याचा दावा केला आहे. हा वाद आता न्यायालयीन पातळीवर गेल्याने सत्यता न्यायालयीन निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. देवस्थानच्या हितासाठी पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर पद्धतीने विश्वस्त निवड होणे आवश्यक असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.