नगर : येत्या 10 फेब्रुवारीपासून बारावीची, तर दि.20 फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. दोन्ही वर्गाचे सुमारे सव्वा लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षार्थींना उत्साहात, आत्मविश्वासाने पेपर देता यावेत यासाठी, तसेच भीतीमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त, झूम ॲप अशा विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान, बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा, तर दहावीचा पहिला पेपर मराठीचा असेल.
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार जिल्हा दक्षता समितीची बैठक शुक्रवारी (दि. 30) झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अध्यक्षस्थानी होते. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, डाएटचे प्राचार्य राजेश बनकर, कार्यकारी अभियंता सुजाता नगराळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे उपस्थित होते. या बैठकीत परीक्षेसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून (मंगळवार) सुरू होणार असून, ती दि. 18 मार्चपर्यंत (बुधवार) सुरू राहील. दहावीची परीक्षा दि. 20 फेब्रुवारीला (शुक्रवार) सुरू होऊन दि.18 मार्चपर्यंत (बुधवार) चालणार आहे.
बारावी आणि दहावीच्या कॉपीमुक्त पेपरसाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून असले. त्यासाठी प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख, तहसीलदार व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
परीक्षा केंद्र स्तरावरील दक्षता पथक निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवण्याच्या व झूम ॲपचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेले दहावीचे 5 व बारावीचे 2 केंद्र असून, तेथे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संवेदनशील केंद्र निश्चित करून तेथे परीक्षा कालावधीत राजपत्रित अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल. सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्राच्या 100 मीटर आतील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येतील.
परीक्षा सुरू ः दि.10 फेब्रुवारी
परीक्षा केंद्र ः 116
परीक्षार्थी ः 62809
परीरक्षक संख्या ः 21
भरारी पथक ः 07
परीक्षा सुरू ः दि. 20 फेब्रुवारी
परीक्षा केंद्र ः 187
परीक्षार्थी ः 72353
परीरक्षक संख्या ः 21
भरारी पथके ः 07
बारावी आणि दहावीची कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाईल. परीक्षा प्रक्रियेत कोणी अडथळा आणला किंवा नियमावलीचा भंग केला, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
विद्यार्थी गैरप्रकारापासून परावृत्त होऊन अभ्यासाकडे वळला पाहिजे. परीक्षार्थींनी कोणतेही दडपण न ठेवता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक