

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये स्री-पुरुष जन्मदरामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. यात कोणी जर काही गैरप्रकार करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला.
बेलापूर खुर्द ग्रामपंचायत, महसूल, पोलिस प्रशासन व श्रीरामपूर पत्रकार संघाच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे, सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले की, बेलापूर खुर्द या गावात मुलींचा जन्मदर अतिशय कमी असून, पालकांनी मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नये. मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा. ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रांताधिकारी किरण सावंत म्हणाले की, एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते. तालुक्याचे, जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते. त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका.
स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या. मनातील नकारात्मक भावना काढून टाका. आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या की, मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरीता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे.
यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी द्वारकनाथ बडवे, कैलास वाकडे, गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे, स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड, मनीषा थोरात, प्रियंका थोरात, कल्पना भगत, ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉ. ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने, संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रणाली भगत, सूत्रसंचालन रवींद्र बारहाते, उपसरपंच दीपक बारहाते यांनी आभार मानले.