

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरडगाव फाटा येथे गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून 9 किलो 854 ग्राम गांजा असा एकूण तीन लाख 46 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सचिन नवनाथ गायकवाड (वय 25, रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), सुक्षय ऊर्फ सोमा सुनील काळे (वय 23, रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी त्या दोघांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले. त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलिस अंमलदार, हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, चालक महादेव भांड यांना कारवाईसाठी रवाना केले. खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असताना पथकास समजले की, दोघेजण दुचाकीवर गांजा घेऊन विक्रीसाठी तरडगाव फाटा येथून गावच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने तत्काळ खर्डा येथे जाऊन सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांना माहिती दिली. त्यानुसार रजपूत यांनी पोलिस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळू खाडे, धनराज बिराजदार, शकील बेग यांच्या पथकाने तरडगाव फाटा (ता. जामखेड) येथे सापळा लावला. संशयित दुचाकी आल्यानंतर पोलिस पथकाने थांबविली आणि दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता दुचाकीवरील गोणीत ऊग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया असा गांजा मिळून आला. तो गांजा सुभाष घुंगरे (रा. माहीजळगाव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर (फरार) यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपींकडून दोन लाख 45 हजार 475 रुपयांचा गांजा, 30 हजारांचे मोबाईल, दुचाकी असा एकूण तीन लाख 46 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.