

नेवासा: सत्तेत येण्यापूर्वी विविध प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी चमकोगिरी थांबवून सत्तेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असे आवाहन आम आदमीचे संजय सुखदान यांनी केले.
दोन दिवसांपासून नगराध्यक्ष डॉ. घुले यांनी, तर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयोजित बैठकीवरून नगरपंचायत चौकात रस्त्यावर मंडपात कारभार सुरू केलेला आहे. नगराध्यक्ष डॉ. घुले यांनी कार्यालयात धुडगूस घातल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांसह 17 जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि. 29) या विविध प्रश्नांवर आम आदमी पक्षाचे संजय सुखदान व उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान, तसेच क्रांतिकारी पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली.
या वेळी संजय सुखदान यांनी सांगितले की, आमच्यावर सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. कायद्याची समज नगराध्यक्षांना नाही. उपनगराध्यक्ष निवडीतही त्यांनी विलंब लावला. प्रोसिंडिंगला सर्व माहिती घेतली नाही. पाणी व स्वच्छता प्रश्नाचा बट्ट्याबोळ झाला आहे. नवीन पाणी योजना कागदावरच आहे. अगोदरच पाण्याच्या दोन टाक्या पाडून टाकल्याने पाणी साठवणुकीला जागा नाही. नवीन कागदावर असलेली पाणी योजना कधी होईल याचा भरवसा नाही. नगराध्यक्षांनी गावाच्या भल्यासाठी राजकारण करू नये. विकास महत्त्वाचा आहे. आम्हालाही गुन्हे दाखल करता येतात; परंतु हे आम्हाला करायचे नाही. आम्ही जाणूनबुजून राजकारण करत असल्याचे जनतेला वाटत असेल, तर आम आदमी व क्रांतिकारीचे सर्व नगरसेवक राजीनामे द्यायला कधीही तयार आहोत.
सत्तेत येण्यापूर्वी नगराध्यक्षांनी शहरातील विविध प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. आता सत्तेवर आल्याने या प्रश्नांची सोडवणूक चमकोगिरी न करता करावी. जनतेच्या प्रश्नावर आम्ही सर्व त्यांच्या सोबत असण्याचे सुखदान यांनी सांगितले. या वेळी गटनेते जितेंद्र कुऱ्हे, नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी विविध प्रश्न मांडले.
योग्य मागण्यांसाठी नेवाशात आंदोलन करायचे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी गुन्हे दाखल करण्यासारख्या गोष्टी केल्याच नाहीत. कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रकार दिसत आहे. वेगवेगळे संभाषण झालेले नाही. केवळ दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ॲड. सादिक शिलेदार, तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी