

नगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर सव्वा महिन्यानंतर शुक्रवारी (दि.30) दुपारी पुन्हा बॉम्बसंदर्भात धमकी देणारे दोन ई-मेल धडकले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. मात्र हे ई-मेल रशियन आणि युक्रेनीयन भाषेतील असून, युक्रेनमधील कीव्ह शहरातील दहा ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्यात देण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर शहर वा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही.
दरम्यान, खबरदारी म्हणून बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉड पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केली. या तपासणीत बॉम्बसदृश वस्तू वा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.30) नेहमीसारखेच कार्यालयीन कामकाज सुरू होते. कामानिमित्त नागरिकांची कार्यालयात गर्दी होती. अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. अशा परिस्थितीत दुपारी 1.47 वाजता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या नावे असलेल्या ई-मेलवर बॉम्बच्या धमकीचा मजकूर आला. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव यांनी तत्काळ या मेलबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. सतर्कता म्हणून तत्काळ पोलिस यंत्रणेला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तत्काळ पोलिस दलाचे बॉम्बशोधक आणि श्वानपथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या पथकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांचे दालन तसेच आणि दुसऱ्या मजल्यावरील इतर विभागांची तपासणी सुरू करण्यात आली.
पोलिस यंत्रणेकडून तपासणी सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या ई-मेलवर 3.50 वाजता दुसरा मेल दाखल झाला. मात्र, बॉम्बसंदर्भातील दोन्ही मेल आले तरीही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात मग्न होते. याबाबत कोणाच्या चेहऱ्यावर तणाव दिसत नव्हता. तपासणीअंती पोलिस दलाच्या बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत कोणत्याही प्रकारची बॉम्बसदृश वस्तू वा इतर संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नि:श्वास सोडला.
या घटनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले की, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर दोन मेल दाखल झाले. हे ई-मेल संदिग्धता निर्माण करणारे आहेत. ते रशियन आणि युक्रेन भाषेत असल्याने त्यावरील मजकुराचे मराठीत रूपांतर करण्यात आले. त्यानुसार या मेलमध्ये युक्रेन येथील कीव्ह शहरातील दहा ठिकाणी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी आहे. मात्र अहिल्यानगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय वा कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख या मेलमध्ये आढळून आलेला नाही. त्यात कीव्हमधील संरक्षण मंत्रालय, तेथील अमेरिकी दूतावास आणि इजिप्तमध्ये कैरो येथील युक्रेनच्या दूतावासाचाही उल्लेख आहे. तरीही खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची तपासणी करण्यात आली.
यापूर्वी 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात असाच ईमेल आला होता. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच अमरावती, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालये तसेच मुंबई व नागपूर उच्च न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली होती. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तपासणी करण्यात आली होती. परंतु त्या तपासणीतदेखील बॉम्बसदृश वस्तू व इतर कोणतेही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नव्हती. मात्र, या धमकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत नाही, अशा ठिकाणीही येत्या काही दिवसांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षाव्यवस्था तैनात केली असून, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.