

नगर: सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या एका तरूणाकडून महिलांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सूरज काळे (रा. निर्मलनगर, सावेडी) या तरुणाविरूध्द एका विवाहित महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि. 29) पहाटे फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले की, सुरज काळे हा गल्लीतून ये-जा करताना महिलांकडे अलिल नजरेने पाहणे, हातवारे करणे असे प्रकार सातत्याने करत आहे. याबाबत संबंधित महिलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तसेच त्याच्या घरच्यांना समज देऊनही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. बुधवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरज काळे याने टेम्पो थेट फिर्यादीच्या घरासमोर लावून जोरजोरात हॉर्न वाजवला. टेम्पोतील टेपचा आवाज वाढवून त्याने फिर्यादीचे नाव घेत बाहेर बोलावले.
फिर्यादी व त्यांची बहीण बाहेर आल्यानंतर सुरजने अत्यंत लज्जास्पद शब्द वापरत जबरदस्तीने हात धरून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे. याचवेळी आरोपी सूरजने फिर्यादीच्या बहिणीशीही अंगलटपणा करत अलिल वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघींनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा होताच सुरजने शिवीगाळ करीत, पोलीस तक्रार केली तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार दीपक गांगर्डे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, परिसरातील नागरिकांनी सूरज काळे विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. आज कारवाई झाली नाही तर उद्या आणखी गंभीर घटना घडू शकते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
परिसरात दहशत; नागरिक वैतागले
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपी सूरज काळे याचा त्रास नवीन नसून यापूर्वीही त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. मात्र, त्या वेळी ठोस कारवाई न झाल्यामुळे त्याचे धाडस वाढले आणि पुन्हा असा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. टेम्पोमधील टेपमध्ये मोठ्या आवाजात रात्री उशिरापर्यंत गाणे वाजविणे, दारू पिऊन गल्लीत शिवीगाळ करत गोंधळ घालणे असे प्रकार त्याच्याकडून दररोज सुरू असल्याने पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.