नगर : अहिल्यानगर शहरालगत तालुक्याच्या गावांत गत काही दिवसांपासून बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना दररोज घडत आहेत. ग्रामीण भागातील बिबट्यांचा धुमाकूळ नित्याचाच झाला असतानाच मंगळवारी (दि.25) दुपारी अहिल्यानगर शहराचा भाग असणाऱ्या ढवनवस्ती परिसरातील कराळे मळ्यात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. शहरालगत बिबट्याचे बछडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी दुपारी तपोवन रोडवरील ढवन वस्ती परिसरात असणाऱ्या कराळे मळ्यात उसाच्या शेतामध्ये मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. बछड्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बछड्यांना ताब्यात घेतले.
बछडे आढळलेल्या ठिकाणी बछड्यांच्या आईचा वावर असल्याकारणाने वनविभागाच्या वतीने पिंजरा बसविण्यात आला आहे. पिलांच्या प्रेमापोटी आई पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बछडे पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहेत. नगर शहरालगत बिबट्यांचे बछडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण भागातील बिबट्यांचा वावर आता शहरालागत देखील आढळून येऊ लागला आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
ग्रामीण भागात दररोज विविध गावांमध्ये बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडतच आहेत. ग्रामीण भागात मानव वस्तीत बिबट्याचा वावर आढळून येत होता. खारे कर्जुने येथील चिमुकलीचा बळी व आठ वर्षे बालकावरील हल्ल्यामुळे वनविभाग बिबट्यांबाबत सतर्क झाला आहे. वनविभागाच्या वतीने बिबट्यांबाबत मोठ्या प्रमाणात शोध मोहीम व जनजागृती सुरू आहे.
बिबट्यांचे बछडे आढळून आल्यास नागरिकांनी त्यांना हाताळू नये. परिसरात जवळच बछड्यांची आई असू शकते. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. बछडे अथवा बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी, शेतकऱ्यांनी स्वत: आणि कुटुंबांची काळजी घ्यावी. विशेषत: लहान बालकांबाबत दक्ष रहावे. वनविभागाच्यावतीने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.
तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे. दररोज विविध गावात पशुधनांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. अनेक गावांनी भरदिवसा मानव वस्तीत बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे. संपूर्ण तालुका बिबट्याच्या दहशतीखाली आहे. त्यातच शहरालगत देखील बिबट्यांचा वावर असल्याचे निष्पन्न झाल्याने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
कोपरगाव : गेल्या काही दिवसांपासून खिर्डी गणेश-टाकळी फाटा परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या काल अखेर संगमनेरच्या शार्प-शूटरच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल आठ तासांच्या श्वास रोखून धरणारा रेस्क्यू ऑपरेशनच्या थरार पहायला मिळाला.
गेल्या काही महिन्यांत खिर्डी गणेश, टाकळी फाटा, नरोडे वस्ती, रेल्वे स्टेशन परिसर या संपूर्ण पट्ट्यात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दोन दिवसांपूर्वीच डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांना हा बिबट्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर नरोडे वस्तीच्या दिशेने जाताना दिसला होता. त्यानंतर वनविभागाचे पथक अधिक सतर्क झाले होते. शंकर आहेर यांच्या शेतात बिबट्या हुलकावणी देत असतानाच संगमनेर येथील शार्प शूटरने अचूक डार्ट मारून त्याला बेशुद्ध केले आणि काही वेळातच त्याला सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद करून राहुरी येथील वनवाटिकेत नेण्यात आले. बिबट्याला पकडण्यात राहुरी, संगमनेर, कोपरगाव येथील वनविभागाची टीम कार्यरत होती.
दरम्यान, बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवकांनी मोठी गर्दी केली होती.
कोकमठाण (कारवाडी शिवार) येथे गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. वन अधिकाऱ्यांना सलग चार दिवस फोन करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.