

नगर तालुका : गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दररोज विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभाग सतर्क झाला असून, विविध गावांमध्ये पिंजरे बसविण्यात आले आहेत. जमिनीबरोबरच आकाशातून ड्रोनद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
खारेकर्जुने परिसरात बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा बळी गेला होता, तर निंबळक परिसरात आठ वर्षीय बालकावर झालेल्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून मोठा रोष पहावयास मिळाला. गाव बंद, तसेच रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध गावांमध्ये वावर असणाऱ्या बिबट्यांबाबत वन विभागाकडून शोध मोहीम राबविली जात आहे. तसेच गावोगावी, शाळा, वाड्या-वस्त्यांवर ध्वनिक्षेपणाद्वारे बिबट्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर मानव वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या शिकारी गोठ्यांमधून केल्या जात आहेत.
तालुक्यातील नगर, जेऊर, गुंडेगाव तीनही मंडलांमधील विविध गावांमध्ये पिंजरे बसविण्यात आलेे आहेत. बहुतांशी गावांमध्ये बिबट्यांचा वावर आढळून येत आहे, तसेच मोठे क्षेत्रफळ असलेल्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक बिबटे असल्याने विविध परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे विविध गावांमधून पिंजरे बसविण्याची मागणी वाढली आहे. परंतु वन विभागाकडे पुरेसे पिंजरे उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे.
जेऊर, वाळकी, इमामपूर, खोसपुरी, ससेवाडी, धनगरवाडी, उदरमल, मजले चिंचोली, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, चास, भोरवाडी, सारोळा कासार, निंबळक, हिंगणगाव, खारेकर्जुने, देहरे, मांजरसुंबा गड, गुंडेगाव, तसेच इतर गावांतील परिसरामध्ये बिबट्यांनी वारंवार दर्शन दिलेले आहे. जेऊर, खोसपुरी, वाळकी, पिंपळगाव माळवी, निंबळक अशा विविध गावांनी पिंजरे बसविण्यात आलेे आहेत. वन विभागाकडून आणखी पिंजऱ्यांची सोय करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वन विभागातर्फे तालुक्यातील बिबट्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे. ज्या गावात अथवा परिसरात बिबट्याचे दर्शन किंवा पशुधनाची शिकार झाली अशा ठिकाणी ड्रोनद्वारे बिबट्यांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार पिंजरा बसविण्याचे नियोजन वन विभागाकडून केले जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपरिमंडळ अधिकारी विठ्ठल गोल्हार, वनरक्षक मनेष जाधव यांच्यासह प्रत्येक मंडळातील वनपाल, वनरक्षक व वन कर्मचारी बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्यांचा संचार वाढलेला आहे. भरदिवसा, तसेच लोकवस्तीत बिबट्यांचा वावर आढळून येतो. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची, तसेच पिंजऱ्यांची संख्याही वाढविण्याची गरज आहे.
बापूसाहेब आव्हाड, माजी सरपंच, पांगरमल
तालुक्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र, तर बाराशे हेक्टर आर्मीचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खासगी डोंगररांगा आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, तसेच रानडुकरे यामुळे बिबट्यांचा वावर मानव वस्तीकडे वाढत चालला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नगर तालुका ः जेऊर गावातील म्हस्के व ठोंबरे वस्ती परिसरात असणाऱ्या खारोळी नदीच्या तीरावर ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेताना वन अधिकारी व कर्मचारी.