

श्रीरामपूर : जिल्ह्यासह तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांना महावितरणने रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी पढेगावचे सरपंच किशोर बनकर यांनी महावितरणकडे केली आहे.
तालुक्यातील पढेगाव, मातापूर, कारेगाव, बोधेगाव, कान्हेगाव परिसरातील गावात बिबट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. पढेगाव व मातापूर परिसरामध्ये मागील चार-पाच दिवसांपूर्वी बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मातापूर व पढेगाव परिसरातील राहत्या घरांपर्यंत बिबट्या पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र दहशत व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. आता सर्व मदार रब्बी हंगामावर असल्याने जीव मुठीत धरून रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढला असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने कृषिपंपासाठी थ्री फेज वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, अशी मागणी बनकर यांनी केली आहे.
गहू, कांदा, ऊस या पिकांना पाणी भरण्यासाठी दिवसा वीज नसल्याने पर्यायाने रात्री जागून भरणे काढावे लागत आहे. त्यातच परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे परिसर भितीच्या छायेखाली आहे. महावितरणने अधिक अंत न पाहता दिवसा थ्री फेज वीज द्यावी.
अविनाश काळे
पुणे जिल्ह्यात बिबट्या प्रवण तालुक्यांमध्ये महावितरणने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. तालुक्यात तसेच जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यातही बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. बिबटे मानवावर हल्ला करत आहेत. त्यामुळे शेती पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचीही भेट घेणार असल्याचे सरपंच बनकर यांनी सांगितले.
चांदा ग्रामसभा उत्साहात; विविध विषयांवर चर्चा
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. त्यामुळे महावितरणने कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशा मागणीचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला .
चांदा ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा सरपंच रावसाहेब दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मागील सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सरकारने थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी या संदर्भात नवीन अध्यादेश काढला असून, त्यामध्ये थकीत बाकी एकरकमी भरणाऱ्याला बिलात 50 टक्के सूट देण्याच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सध्या चांदा आणि परिसरात दहा ते बारा बिबट्यांचा वावर असून, त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पाळीव कुत्रे व जनावरे फस्त केली आहेत. सध्या रब्बी हंगामाची पेरणी व लागवड सुरू असल्याने शेतीला पाणी देणे आवश्यक आहे.
मात्र, रात्रीच्या वेळी बिबट्याच्या धास्तीने शेतीला पाणी देणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महावितरणने शेतीला दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. जर वीजपुरवठा दिवसा न केल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामसभेत देण्यात आला. या विषयांसह दशक्रियाविधीसाठी जागा उपलब्ध करणे, गावातील देवस्थानांचा जीर्णोद्धार होण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणे आदींसह विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले .
या वेळी कारभारी जावळे, एन. टी. शिंदे, कृषी सहायक भराट, कामगार तलाठी बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गाढवे, देविदास पासलकर, बाबासाहेब आल्हाट, अशोक गाढवे, थिटे, दहातोंडे आदींनी चर्चेत भाग घेतला. सरपंच रावसाहेब दहातोंडे यांनी आभार मानले.
बिबट्यांच्या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
नगर : गावागावांत व शेती परिसरात बिबट्या तसेच इतर हिंसक प्राण्यांचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतीकामासाठी जाण्यास टाळाटाळ करु लागले आहेत. त्यामुळे दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.24) महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांना निवेदन दिले. यावेळी यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुकाध्यक्ष शरद पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, भरत बोरवे, चंद्रकांत पवार, गणेश तोडमल, महेश शेळके, युवराज हजारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, शासन आणि महावितरणाच्या वतीने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याची योजना लागू केली असली, तरी प्रत्यक्षात केवळ तीन तासच वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. अल्पवेळ वीजपुरवठ्याने सिंचनाचे काम अर्धवट राहाते. सध्या बिबट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेचा धोका अधिक गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रात्रीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा आणि दिवसा स्थिर, अखंड वीज उपलब्ध करावी, तसेच वीजपुरवठ्यातील अनियमितता, लोडशेडिंग, कमी व्होल्टेज यांसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना अचूक वीजपुरवठ्यासंबंधी वेळापत्रकाची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.