

निमोणे : शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणात श्रीगोंदा हद्दीमध्ये शिरूर व श्रीगोंदा महसूल पथकाने संयुक्त कारवाई करीत वाळू काढणाऱ्या सहा यांत्रिक बोटी आणि वाहतूक करणाऱ्या सात फायबर बोटी जिलेटीनच्या स्फोटाने उडवून दिल्या, अशी माहिती मंडलाधिकारी नंदकुमार खरात यांनी दिली.
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे, शिरूरच्या निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही तालुक्यांतील महसूल पथकाने मंगळवारी (दि. 25) सकाळी 10 वाजेदरम्यान दोन्ही हद्दीतून स्वयंचलित यांत्रिक बोटीच्या साहाय्याने घोड जलाशयात प्रवेश केला.
या वेळी वाळू काढणाऱ्या यांत्रिक बोटी श्रीगोंदा तालुक्यातील माठ राजापूर गावच्या हद्दीत आढळून आल्यानंतर कारवाई पथकाने जिलेटीनच्या त्या उडवून दिल्या. यामध्ये सहा यांत्रिक आणि सात वाळू वाहतूक करणाऱ्या फायबर बोटी यांचा समावेश आहे. ही संयुक्त कारवाई करीत असताना महसूल प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली. त्यामुळेच कारवाई यशस्वी करता आली, अशी माहिती मंडलाधिकारी नंदकुमार खरात यांनी दिली.
या कारवाई पथकामध्ये श्रीगोंदा महसूलचे मंडलाधिकारी राजेंद्र ढगे, ग्राम महसूल अधिकारी विनोद जाधव, महेश धुमाळ, महेश शिंदे, बाबासाहेब भवर, राजीव साळुंखे, प्रशांत गौडकर, राजेंद्र भुतकर, प्रतीक धनवटे; तर शिरूर महसूल पथकात मंडलाधिकारी नंदकुमार खरात, ग्राम महसूल अधिकारी हर्षद साबळे, सिद्धार्थ वाघमारे, राजू बडे, आढाव आदींनी भाग घेतला.