उत्तर महाराष्ट्र

नाशिक : तुंबलेल्या ठिकाणांची मनपा आयुक्त करणार पाहणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात बुधवारी (दि.22) पहिल्याच पावसाने जुने नाशिकमधील गावठाण भागात पाणी तुंबल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या स्मार्ट कामांमुळे त्यात भर पडली असून, या सर्व कामांची तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात मनपा आयुक्त रमेश पवार येत्या दोन दिवसांत परिसराची पाहणी करणार आहेत.

पहिल्याच मुसळधार पावसाने जुने नाशिक भागातील हुंडीवाला लेन, दहीपूल तसेच सराफ बाजार या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हुंडीवाला लेन भागात तर पाण्याचा प्रवाह इतका होता की, पार्किंग केलेली वाहने वाहून चालली होती. मात्र, नागरिकांनी वाहने पकडल्याने आर्थिक नुकसान टळले. पूर्वीही प्रत्येक पावसाळ्यात सराफ बाजार, दहीपूल भागात पाणी साचल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यावर मार्ग काढण्याबाबत मनपाकडून अनेकदा प्रयत्न झाले. त्यात दीड-दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट योजनेंतर्गत रस्त्यांची तसेच त्यालगत ड्रेनेजची कामे हाती घेतली होती. ही कामे होत असतानाच रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी त्यातील अनेक त्रुटी दाखवून दिल्या होत्या. त्यानंतरही स्मार्ट सिटी कंपनीने कामांमध्ये बदल केला नाही. त्याचाच परिणाम म्हणून नाशिकमध्ये पहिल्याच पावसात स्मार्ट कामांचा फज्जा उडाला आणि मनपाच्या नियोजनाचेही तीन तेरा वाजलेले पाहावयास मिळाले.

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि बांधकाम विभागाला माहिती घेण्यास तसेच प्लास्टिक आणि इतर केरकचर्‍यांमुळे ड्रेनेज वा चेंबर्स बुजलेलेे असल्यास ते मोकळे करण्याचे आदेश बजावले. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सर्व विभागीय अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षकांना पत्र जारी करीत चेंबर्स स्वच्छ करण्यास सांगितले आहे.

येत्या दोन दिवसांत शहर अभियंत्यांबरोबर संबंधित भागांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. प्लास्टिक आणि इतर केरकचर्‍यांमुळे ड्रेनेज वा चेंबर्स बुजलेलेे असल्यास ते मोकळे करण्याचे आदेश बजावले असून, यंदाच्या पावसाळ्यात रहिवाशांची गैरसोय होणार नाही.
– रमेश पवार, आयुक्त, मनपा

व्यापारी पेठेमुळे केरकचरा
भद्रकाली तसेच हुंडीवाला लेन, दहीपूल, सराफ बाजार हा संपूर्ण परिसर शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातून केरकचराही मोठ्या प्रमाणात तयार होतो. त्यात प्लास्टिक, कागद आणि खोक्याचे प्रमाण अधिक असते. त्यातील बहुतांश कचरा हा काही व्यावसायिकांकडून नाल्याच्या ड्रेनेज तसेच चेंबर्समध्ये ढकलून दिला जातो. त्याचमुळे वर्षानुवर्षे नाल्यातील कचर्‍याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

सरस्वती नाला स्वच्छतेची गरज
जुने नाशिक परिसरातील भद्रकाली ते सराफ बाजार आणि तिथून पुढे टाळकुटेश्वर असा प्रवास करणार्‍या सरस्वती नाल्याची स्वच्छता गेल्या कित्येक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळेच या भागातून गोदावरीकडे वाहून जाणारे पाणी नाल्यातून पूर्ण क्षमतेने वाहून जात नाही. परिणामी या परिसरात पाणी साचण्याचा प्रकार दरवर्षी घडतो. नाला बंदिस्त असल्याने स्वच्छता करण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळेच अद्यापपर्यंत त्याविषयी मनपाकडूनही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरवर्षी केवळ पावसाळ्यात त्याची आठवण मनपाला होते इतकेच.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT