

लंडन : जेसन रॉय व जोस बटलर यांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची धुलाई करताना तिसर्या वन-डेत इंग्लंडला 8 विकेटस् व 20 षटके राखून विजय मिळवून दिला. इंग्लंडने तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. रॉयने 101 धावांची खेळी करताना वन-डेतील 10 वे शतक पूर्ण केले, तर बटलरने नाबाद 86 धावा केल्या. नेदरलँडचा संघ 3 बाद 203 वरून सर्वबाद 244 असा गडगडला. इंग्लंडने हे लक्ष्य 30.1 षटकांत दोन विकेटस्च्या मोबदल्यात पार केले.
वन-डे वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडने 20 षटके राखून बाजी मारली. रॉयने 86 चेंडूंत शतक पूर्ण केले. फिल सॉल्टने 49 धावा केल्या, तर बटलरने 64 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 86 धावा चोपल्या.
या मालिकेत बटलरने दमदार खेळ करताना महेंद्रसिंग धोनीचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. एकाच वन-डे मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. आता तो बटलरच्या नावे नोंदवला गेला आहे. या मालिकेत बटलरने 19 षटकार खेचले.
महेंद्रसिंग धोनीने 2005 साली श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 17 षटकार खेचले होते. 2015 मध्ये ए. बी. डिव्हिलियर्स वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 16 षटकारांसह धोनीच्या विक्रमाच्या आसपास पोहोचला होता. 2019 मध्ये बटलरने वेस्ट इंडिजविरुद्ध 14 षटकार खेचले होते.