तब्बल 18 फूट लांबीचा अजगर! | पुढारी

तब्बल 18 फूट लांबीचा अजगर!

वॉशिंग्टन  : अमेरिकेत फ्लोरिडामध्ये तब्बल 18 फूट लांबीचा बर्मीज अजगर सापडला आहे. एव्हरग्लेडस् येथे सापडलेल्या या अजगराचे वजन 215 पौंड म्हणजेच 97 किलो आहे. यापूर्वी फ्लोरिडा राज्यात सापडलेल्या सर्वात मोठ्या अजगरापेक्षा हा अजगर 30 पौंड म्हणजेच 13.6 किलोंनी अधिक वजनदार आहे.

बर्मीज पायथॉन या अजगराच्या प्रजातीचे शास्त्रीय नाव ‘पायथॉन बिवीटेटस’ असे आहे. फ्लोरिडामध्ये सापडणार्‍या या अजगरांपैकी बहुतांश अजगर हे 6 ते 10 फूट लांबीचे असतात. हे अजगर मूळचे आग्‍नेय आशियातील आहेत. तिथे या अजगरांची लांबी सर्वसाधारणपणे 18 ते 20 फुटांचीही असते.

1970 च्या दशकात हे अजगर फ्लोरिडामध्ये आणण्यात आले होते व तिथे त्यांची प्रजाती चांगलीच बहरली. पक्षी, छोटे सस्तन प्राणी खाऊन हे अजगर राहतात. कधी कधी ते मगरी व पाळीव कुत्र्यांचीही शिकार करतात. आकाराने मोठे असले, तरी हे अजगर चटकन अवतीभोवतीच्या स्थितीतून ओळखून येत नाहीत. आता जो अजगर सापडला आहे तो मादी आहे.

Back to top button