

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिवसेनेचे काही आमदार हे शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत असतानाच सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून येत आहे. कडवे शिवसैनिक हे कुठल्या पदासाठी निष्ठा बाळगून नसतात. तर केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी इमान राखून असतात. अशीच भूमिका घेत आज पंढरपूर येथे शिवसैनिकांनी शिवसेनेवरील हे अरिष्ट दूर व्हावे. यासाठी श्री विठ्ठलास साकडे घातले.
येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत.शिवसेना आमच्या रक्तात आहे. किती आमदार, खासदार आले आणि गेले. शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्मथनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या बैठकीत बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की, शिवसेना ही हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर उभा राहिलेली संघटना आहे. सामान्य शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि संघर्ष हा शिवसैनिकांना नवा नाही.आपण सर्वजण पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी,आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू.
सांगोला विधानसभा मतदार संघासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक निधी दिला. विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारात दिलेला शब्द पाळला. तरीही जर कोण शिवसेनेला अडचणीत आणू पहात असेल तर त्याला आडवा करून सामान्य शिवसैनिकांच्या बळावर आपण पुन्हा उभा राहू, असा निर्धार व्यक्त केला. या बैठकीस उपजिल्हा उपप्रमुख दत्ता पवार, युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे, महेश साठे, महावीर देशमुख, सूर्यकांत घाडगे, नामदेव वाघमारे, संजय घोडके, पूनम अभंगराव, सुधीर अभंगराव, जयवंत माने, आशाताई टोणपे, आरती बसवंती, सिद्धू कोरे, रवींद्र मुळे, संगीताताई पवार, रणजित कदम, वैष्णवी गायकवाड आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.