उद्धव ठाकरे file photo
मुंबई

Voting Ink Controversy: बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय! – उद्धव ठाकरे यांचा सरकार-निवडणूक आयोगावर घणाघात

मतदानातील गैरप्रकारांवर संताप; निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याची ठाकरे यांची थेट मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसून जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे. यापूर्वी असा प्रकार कधी झाला नव्हता. परंतु, सर्व निवडणूक जिंकण्यासाठी सरकारचा हा आटापिटा सुरू आहे, असा आरोप करत ही बोटावरची शाई नाही, तर लोकशाही पुसली जात आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर केला.

निवडणूक आयोग हा जनतेचा फुकटचा पैसा खाणारा आणि सरकारची लाचारी करणारा आहे, अशी टीका करतानाच निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी जोरदार मागणीही ठाकरे यांनी केली.

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) मतदान पार पडले. मतदानादरम्यान मात्र अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड झाला. काही ठिकाणी मशीन बंद पडल्या, तर काही ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली, बोटावर लावलेल्या मार्करची शाई पुसली जात होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतील गोंधळ आणि गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरले.

वाट्टेल ते करा, पण सत्ता काबीज करा

उद्धव ठाकरे म्हणाले, हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. मोदींना जे वन-नेशन वन-इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की, एकावेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाट्टेल ते करा, पण सत्ता काबीज करा, अशी टीका करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तसेच आताही दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे आयोगाला दिले. एवढे करूनही आजदेखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावे समोर येत आहेत. काहींची मतदान केंद्रे गायब आहेत. शाई पुसली जातेय. पण ही बोटावरची शाई नसून लोकशाही पुसली जातेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयुक्तांना निलंबित करा

9 वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. नवीन मतदार येतात आणि जातात, मात्र त्यात सुधारणा कसल्याही दिसत नाहीत. मग निवडणूक आयुक्त नेमके कसले पैसे खात आहेत, असा संतापही ठाकरे यांनी व्यक्त केला. गणेश नाईकांचे मतदान केंद्रच फरार होते. त्यांना मतदान केंद्र शोधण्याकरता चार तास लागले. ही मंत्र्यांची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार... त्यांचा टांगा पलटी झाला नाही, पण खेटे घालून त्यांच्या टांगा दुखल्या आहेत, असा चिमटा काढत यावर पर्याय म्हणून निवडणूक आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

हरलेल्या मानसिकतेमुळे सत्ताधाऱ्यांचे गैरप्रकार

विरोधकांनी गैरप्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर हा त्यांचा रडीचा डाव आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा रडीचा डाव आहे, मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घरगडी नेमले आहात का? हा सर्व प्रकार म्हणजे धाकदपटशा, पैसे देण्याचा प्रकार सुरू होता, त्यांचे हे सर्व बिंग उघड झाले आहे. महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका जिंकण्याकरताही महायुतीकडे कर्तृत्व काही नाही आहे. आम्ही त्यांचे कुभांड फोडत आहे. त्यांचा दरोडा घालण्याचा प्रकार आम्ही वेळोवेळी जनतेसमोर आणत आहोत, असे सांगत पैसे वाटताना त्यांचीच लोकं पकडली गेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चोर कंपन्या हरलेल्या आहेत. हरलेल्या मानसिकतेमुळे सत्ताधाऱ्यांना असे गैरप्रकार करावे लागत आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

फडणवीस-आयोगाची मिलीभगत

निवडणूक आयोग जर शाई पुसली तरी पुन्हा मतदान करता येणार नाही, असे म्हणत असेल तर ती शाई पुसलीच कशी जाते, पुन्हा मतदान करता येणारी नाही असे आयोग एवढ्या खात्रीने कसा काय सांगू शकतो, असे सवालही ठाकरेंनी उपस्थित केले. ज्या ठिकाणी ज्यांचे दोन वेळा नाव नोंदवले गेले आहे, त्यांच्याकडून हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्रे आयोगाने घेतली आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली. बोटावरील शाई पुसण्याचा प्रकार ढळढळीत सत्य असताना देवेंद्र फडणवीस, निवडणूक आयोग नाकारत असेल तर ही त्यांची मिलीभगत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. एकीकडे संविधान म्हणतेय मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणतोय मतदान करूनच दाखवा, असे सांगत आयोग हा संविधानविरोधी असून आयुक्तांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. आयोगाचा कर्मचारी रोज काय करतो, याचा छडा लावावा लागेल. कारण ते बसल्या जागी पगार खात आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवून त्यांचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT