Municipal elections | उमेदवारांवर हल्ला, ईव्हीएम फोडले; मतदानाला गालबोट
मुंबई/नागपूर/नाशिक/जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी विविध शहरांमधून हिंसाचार, तोडफोड आणि राजकीय संघर्षाच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. नागपुरात भाजपच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला; तर नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झाला. जळगावमध्ये मतदान सुरू असतानाच हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. नागपूर येथे काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले; तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार-पोलिसांत बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.
नागपूरमध्ये भाजप उमेदवारास भूषण शिंगणे यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण नागपुरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने वातावरण तापले. तसे नागपुरातील काँग्रेसचे अस्थायी कार्यालय जाळण्याची घटना एका प्रभागात घडली. भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसवर गुंडांना हाताशी घेत सर्वसामान्य उमेदवारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. या पद्धतीने लोकशाहीत या प्रकारांना जनता भीक घालणार नाही महायुतीलाच कौल मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतल्यावर केला. मध्यरात्रीच्या वेळी गोरेवाडा परिसरात पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी भूषण शिंदे हे तिकडे गेले होते. विठ्ठल यांच्या घरी जाऊन माहिती घेण्याच्या प्रयत्नात असताना काही तरुण पुढे आले. लागलीच एका जमावाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केलीली.
बोरिवलीत गार्डने पकडले बोगस व्होटर आयडी
बोरिवली प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड यांनी बोगस व्होटर आयडी पकडले आहेत. भाजपकडून फेक व्होटर आयडी वाटले जाऊन मतदानासाठी लोकांना आणले जात आहे, त्याशिवाय भाजपकडून व्होटिंग स्लिप दिल्या जात आहेत असा आरोप भगवा गार्ड यांच्याकडून करण्यात आला.
नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांच्या घरावर धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणातून शिंदे सेना व भाजपचे कार्यकर्ते भिडले.
धुळ्यात कार्यकर्ते भिडले
प्रभाग 18 मध्ये मतदानावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रभागातील मिरच्या मारुती पंच मंडळाच्या शाळा आवारात एका खोलीतील ईव्हीएम मशिन तोडफोडीचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला आहे.
संभाजीनगरमध्ये उमेदवार-पोलिसांत बाचाबाची
छत्रपती संभाजीनगरमधील संत मीरा मतदान केंद्रावर मोठा राडा झाला. भाजप उमेदवाराने पोलचीटवर पक्षाचे चिन्ह आणि कोडिंग असलेले टी-शर्ट वापरल्याचा आक्षेप शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी घेतला. यावरून अपक्ष उमेदवार आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
चंद्रपुरात राडा
चंद्रपूरच्या नेहरू शाळा मतदान केंद्रावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप बंडखोर समर्थकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्यावरून राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला.
नागपुरात काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळल्याचा आरोप
शहरातील प्रभाग 31 मधील काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाबाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जळाले आहे. मात्र, हे कार्यालय जाळले की जाळले असा संशय काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येतोय; तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करत कार्यालय बाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळण्यात आल्याचा आरोप केला आहे.
जळगावमध्ये मतदान सुरू असतानाच हवेत गोळीबार
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात मतदानाच्या दिवशीच हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली. मात्र, हा प्रकार कोणत्याही राजकीय कारणातून घडलेला नसून दोन तरुणांमधील वैयक्तिक वादातून घडल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दोन व्यक्तींमध्ये असलेला जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर तो थेट भांडणात बदलला. रागाच्या भरात एका तरुणाने अचानक हवेत गोळीबार केला.

