

मुंबई : राजकीयद़ृष्ट्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत गुरुवारी मतदानाच्या दिवशी बोटाला लावण्यात येणारी मार्करची शाई आणि बोगस मतदार रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तैनात केलेला भगवा गार्ड यावरून गोंधळ उडाला; तर अशा पद्धतीने दहशत निर्माण करायची आता यांची क्षमताच राहिली नाही. कोणी केले तर पोलिस ठोकून काढतील. मुंबईत दहशत खपून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता बजावले.
निवडणुकीत बोगस किंवा दुबार मतदार रोखण्यासाठी मनसेने उत्तर मुंबईतील काही मतदान केंद्रांवर आपल्या कार्यकर्त्यांना भगवा गार्ड म्हणून तैनात केले होते. हे कार्यकर्ते भगव्या रंगाचा टी शर्ट घालून होते. त्यावर ‘मी मराठी, भगवा गार्ड’ असा उल्लेख होता. दहिसर येथील मतदान केंद्रावर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी पाहणीसाठी आल्या असताना त्यांना भगवा गार्डकडून विरोध झाला. परिणामी, तेथे तणाव निर्माण होऊन पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी भगवा गार्डला रोखले. त्यांना मतदान केंद्रापासून दूर जाण्यास सांगितले. त्यावरून पोलिस आणि भगवा गार्ड यांच्यात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर घेऊन गेले.
माझ्या बोटावरची शाई पुसून दाखवा
बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा दावा खोडून काढताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्करची शाई लावण्यात आलेले स्वतःचे बोट दाखवत माझ्या बोटावरची शाई पुसून दाखवा, असे आव्हान दिले. हा विरोधी पक्षांकडून उगाचच संशय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. निकालानंतर कशाला दोष द्यायचा, याची ते तयारी करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.