

मुंबई : मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. हा निकाल भाजपा-शिवसेना महायुतीसह उद्धव-राज या ठाकरे बंधूंचे मुंबईतील राजकीय भवितव्य ठरवणार आहे. कोण बाजी मारणार हे अवघ्या तासात स्पष्ट होणार आहे.
देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता यावी, यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्नशील होते. 1997 पासून 2022 पर्यंत सलग 25 वर्षे सत्ता असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ठाकरे गटापुढे आव्हान निर्माण झाले. याशिवाय भाजपा हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे गटासाठी म्हणावी तशी सोपे नव्हती. मात्र भाऊ राज ठाकरे यांनी दिलेल्या साथीमुळे ठाकरे गटाला भाजपा व शिंदेंशी झुंज देणे शक्य झाले.
भाजपा व शिवसेना शिंदे गटालाही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या सत्तेवर येण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीमुळे महापालिकेची सत्ता ठाकरेंकडे गेली. परंतु यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. त्यानुसार मुंबईत पक्षबांधणीही मजबूत केली. यावेळी भाजपाची महापालिकेत सत्ता आल्यास त्यांचे मुंबईतील स्थान अजून भक्कम होणार आहे. शिवसेना शिंदेंसाठीही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेना शिंदे गटाचे 92 उमेदवार उभे असून यातील जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिंदेंकडून जोरदार प्रयत्न झाले. यात त्यांना यश मिळाले तर मुंबईतील त्यांचे राजकीय अस्तित्व फुलणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्वही या निवडणुकीमुळे निश्चित होणार आहे. या निवडणुकीत मनसेचा पत्ता चालला, तर दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईतून कोणी हलवू शकणार नाही. पण या निवडणुकीत मनसेचा पराभव झाला, तर मुंबईतून मनसेचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल. भाऊ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याचा राज ठाकरे यांना किती फायदा होतो. हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.