

नरेश कदम
मुंबई : 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या पाठीशी उभे राहिलेले मराठी व मुस्लिम मतदार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही सोबत असल्याचे चित्र गुरुवारी मतदानांत दिसले. त्यामुळे मराठी आणि मुस्लिमबहुल प्रभागात या दोन्ही पक्षांचे उमेदवार जिंकतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेले मराठी-मुस्लिम समीकरणाने यावेळी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला साथ दिली आहे. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेची हाक दिली होती. त्यामुळे मराठी मतदारांमध्ये यावेळी उत्साह दिसत होता.
मुंबईतील गिरगाव, लालबाग, परेल, डिलाईरोड, वरळी, दादर, माहिम, जोगेश्वरी, विलेपार्ले, विक्रोळी, भांडूप या मराठीबहुल भागात मराठी मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे उद्धव सेना आणि मनसेला मुंबईतील या भागात चांगल्या जागा जिंकता येतील, अशी स्थिती आहे. मात्र, राज आणि उद्धव हे एकत्र आले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे ज्या मागाठाणे, चेंबूर, कुर्ला, भांडूप आदी भागात प्राबल्य आहे तेथे मराठी मतांचे विभाजन करण्यात शिंदे यशस्वी झाल्याचे दिसत आहेत. काही मराठी मतांसह भाजपची वोट बँक असलेल्या गुजराती आणि उत्तर भारतीय मतांच्या जोरावर काही प्रभाग शिंदे गट जिंकेल , असे दिसते.
2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेने स्वबळावर लढून 84 जागा जिंकल्या होत्या. मात्र, भाजप आणि मनसे वेगळी लढली असली तरी शिवसेना फुटली नव्हती. शिंदे यांनी शिवसेना फोडल्याचा फटका ठाकरे बंधूंना बसण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे यांची ताकद भाजपला फायदेशीर ठरली असल्याचे दिसत आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना 84 आणि मनसेला 7 अशा 91 जागा मराठीबहुल असल्याचे गृहीत धरले तरी त्यात काही प्रभागात शिंदेमुळे थोडा फटका बसू शकेल.
दुसरीकडे 25 मुस्लिमबहुल प्रभागात काँग्रेस, सपा, एमआयएम आणि अजित पवार गट, उद्धव गट यांच्यात लढती झाल्या असल्या तरी मानखुर्द मधील दोन जागा आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या भागातील दोन जागा वगळल्या तर काँग्रेस बहुंताश जागा जिंकेल. दोन तीन जागा उद्धव ठाकरे यांना ही मिळतील.
मराठी-मुस्लिम समीकरणार उद्धव सेनेला संधी
महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, सपा हे घटक पक्ष वेगळे लढत आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होईल की काय? अशी भीती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जाणवत होती. पण ज्या प्रभागात 15 हजारच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत तेथे काँग्रेसला मतदान केल्याचे दिसते. तथापि, जेथे 5 ते 7 हजार मुस्लिम मते आहेत तेथे उद्धव ठाकरे गटाला मुस्लिम मते पडली आहेत. त्यामुळे मराठी मुस्लिम समीकरण जेथे जुळले आहे तेथे उद्धव गटाला विजयाची संधी दिसत आहे. तथापि, मालाड, अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, शिवाजीनगर, चांदिवली, कुर्ला, सायन, धारावी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा आदी प्रभागांत काँग्रेस, सपा, अजित पवार गट व उद्धव यांना यश मिळण्याची शक्यता आहे.