Maharashtra Rajya Sabha Election Pudhari
मुंबई

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; शरद पवार, पार्थ पवारांसह ७ उमेदवारांची घोषणा

भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते मैदानात; महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांपैकी भाजपने विधानसभेतील आपल्या संख्याबळानुसार 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी केली असताना महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून शिवसेनेकडून एका नेत्याची उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार!

पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. तब्बल सहा वर्षांनंतर तावडे हे पुन्हा एकदा संसदीय राजकारणात परतणार आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांना पुन्हा एकदा भाजपने राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया ईवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे.

मराठवाड्यातील हिंगोलीतील माजी विधानपरिषद सदस्य व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वडकुते यांना अनपेक्षितरित्या राज्यसभेची लॉटरी लागली आहे. वडकुते हे धनगर समाजातून येतात. परभणी-हिंगोली भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख गुरुवार 5 मार्च रोजी आहे. राज्यसभेचे सर्व 7 उमेदवारी गुरुवारी विधिमंडळात आपापले अर्ज दाखल करतील. भाजपकडून 4, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून प्रत्येकी 1 उमेदवार जाहीर केला आहे.

शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीतून राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशा तिन्ही पक्षांनी दावा केला होता. महाविकास आघाडीत 20 आमदार असणारा शिवसेना (ठाकरे) पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे ठाकरेंनी राज्यसभेवर दावा केला होता. प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेचे प्रयत्न होते. दुसरीकडे काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी दोन जागांची गरज होती. त्यामुळे काँग्रेसनेही राज्यसभेची जागा मिळावी अशी दोन्ही मित्रपक्षाकडे मागणी केली. मात्र, शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्याचा आग्रह धरला होता. पवारांचा हा आग्रह काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनाही मान्य करणे भाग पडले. शरद पवारांच्या उमेदवारीबाबत राज्यात एकमत होत नसल्याने सुप्रिया सुळे यांनी थेट राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसने पवारांच्या नावाला होकार दिला. दुसरीकडे, उबाठालाही इच्छा नसतानाही शरद पवारांना पाठिंबा द्यावा लागला.

भाजपपासून दूर राहण्याच्या अटीवर शरद पवारांना ‌‘मविआ‌’चा पाठिंबा

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने ‌‘एनडीए‌’शी कधीही हातमिळवणी करणार नाही, हे घोषित केले तरच शिवसेना ‌‘उबाठा‌’ राज्यसभेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देऊ शकेल, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली होती. मंगळवारी रात्री ‌‘मातोश्री‌’वर उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेची इनसाईड स्टोरी ‌‘पुढारी‌’च्या हाती लागली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अटीनुसार, विलीनीकरणाची चर्चा मागे पडली ही जाहीर घोषणा झाल्यानंतरच शरद पवार यांच्या उमेदवारीला औपचारिक पाठिंबा दिला गेला. मात्र, यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना ‌‘उबाठा‌’चा एकही नेता हजर राहिला नाही.

राज्यसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जिंकून येणाऱ्या एकमेव जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब तर झाले; परंतु त्यांना पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेना ‌‘उबाठा‌’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही अटी घातल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विलीनीकरण करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‌‘एनडीए‌’शी हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्ट वचन पाहिजे, तेही जाहीरपणे पाहिजे, अशी अट मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर ठेवली होती. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची चर्चा मागे पडली, असे विधान केल्यानंतरच शिवसेना ‌‘उबाठा‌’ने शरद पवार यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीला मान्यता दिली. यासंबंधीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात हर्षवर्धन सपकाळ आणि सुप्रिया सुळे यांची जी पत्रकार परिषद झाली, त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता.

...म्हणून आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेला गेले नाहीत

आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांना उमेदवारी दिल्याची घोषणा परस्पर करण्याच्या संजय राऊत यांच्या विधानाला विरोध केल्यामुळे ते या पत्रकार परिषदेत गेले नाहीत, असे समजते.

चक्रे फिरली, उमेदवारी निश्चित झाली

शरद पवार गट विलीनीकरणानंतर नेमकी काय भूमिका घेईल, याबद्दल शिवसेना ‌‘उबाठा‌’ने त्यांच्याकडून शब्द घ्यावा, अशी काँग्रेसची भावना होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी विलीनीकरणाची घोषणा प्रत्यक्षात येणार नाही. ती जुनी गोष्ट आहे हे सांगायला हवे, असे ठामपणे नमूद केले. त्यानंतर जी चक्रे हलली त्यात जयंत पाटील यांनी विलीनीकरण नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांची उमेदवारी निश्चित केली गेली.

सोनिया गांधींनी केली पवारांची उमेदवारी निश्चित

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीबद्दल राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांच्याशी सुप्रिया सुळे यांचा सतत संपर्क होतो. संभाव्य विलीनीकरण आणि शरद पवार यांचे वय लक्षात घेता त्यांना आता संधी द्यावी की नको, असा प्रश्न काँग्रेसच्या मनात होता. मात्र, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना या वयात उमेदवारी न देणे योग्य ठरणार नाही. चुकीचे संकेत जातील आणि ‌‘यूपीए‌’च्या ऐक्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल, अशी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार यांची उमेदवारी निश्चित झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT