

चंदन शिरवाळे
मुंबई : युद्धाचा भडका उडालेल्या आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्राच्या 1 हजार 426 पर्यटक-प्रवाशांशी राज्य आपत्कालीन संचालन केंद्राचा संपर्क झाला आहे. यात सांगली जिल्ह्यातील 44 जणांचा समावेश आहे. या मराठीजनांना राज्यात परतण्यासाठी 58 विमाने उड्डाण करणार असून, हे आपत्कालीन परिस्थितीत केले जाणारे ‘महा एअरलिफ्ट’ ठरणार आहे.
आखाती युद्धाचा भडका उडताच युद्धग्रस्त कतार, यूएई, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, ओमान, इराण, इस्रायल, जॉर्डन आदी व अन्य देशांमधून मराठीजनांच्या मदतीच्या हाका सरकारपर्यंत पोहोचल्या. मात्र, या पर्यटक-प्रवाशांची संख्या आणि ठावठिकाणा याचा अंदाज लागत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालीन संचालन केंद्राने एक लिंक तयार केली. सामाजिक माध्यमांसह देशोदेशी असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातूनही ही लिंक सर्वत्र पोहोचली आणि बुधवार संध्याकाळपर्यंत 1 हजार 426 जणांनी विविध आखाती देशांतील आपला ठावठिकाणा मंत्रालयातील संचालन केंद्राला कळविला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी ‘पुढारी’ला सांगितले.
मंगळवारी 405 प्रवासी-पर्यटक मुंबईत उतरले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या दोन विमानांची मोठी मदत झाली. मात्र, विमानांअभावी अनेक प्रवासी अजूनही आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आता भारतीय विमान कंपन्या 58 उड्डाणांची योजना आखत आहेत. त्यामध्ये 30 इंडिगो, 23 एअर इंडिया/एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इतर कंपन्यांच्या विमानांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1 हजार 221 भारतीय विमान कंपन्यांची आणि 388 परदेशी विमान कंपन्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत. 3 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांनी 24, तर एमिरेटस् आणि एतिहाद यांनी मिळून 9 उड्डाणे केली. परदेशी विमान कंपन्या मर्यादित प्रमाणात उड्डाणे करत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे एकाच वेळी 58 विमाने उडतील आणि मराठीजनांना घेऊन येतील, असे ‘महा-एअरलिफ्ट’ आखले जात आहे.