CM Devendra Fadnavis | देशाला दोन महिने पुरेल इतका तेलसाठा; तातडीने दरवाढ नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत ग्वाही
Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : आखाती देशांत युद्ध सुरू असले, तरी देशात दोन महिने पुरेल इतका तेलसाठा उपलब्ध असून, त्यामुळे विद्यमान परिस्थितीत तातडीने दरवाढीची भीती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. तसेच, विदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

सदस्य संजय केनेकर, निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, तेलसाठ्याबाबत सध्या तातडीने दरवाढीची भीती नाही. युद्धामुळे शेतीमाल निर्यातीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल आणि आवश्यक त्या पातळीवर हस्तक्षेप करण्याचा विचार करण्यात येईल. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून, त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर पर्यटक, व्यावसायिक तसेच ट्रान्झिटमध्ये असलेल्या नागरिकांचे संदेश आल्यानंतर तत्काळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला.

त्याचबरोबर संबंधित देशांतील भारतीय दूतावासांना सक्रिय करण्यात आले असून, नागरिकांना दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गावंडे यांनाही जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी दूतावासांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. या सूचनांची माहिती ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरूनही प्रसारित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडूनच

आवश्यक प्रक्रिया

राज्य शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, केंद्र सरकारने सध्या असुरक्षित हवाई वाहतुकीमुळे ही प्रक्रिया केंद्राच्या अखत्यारीतच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल. कुवेतमध्ये काही प्रवाशांना व्हिसा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांमुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच, मिहीर कोटेचा यांनी दुबई येथे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना या उपक्रमाचा लाभ होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news