

Maharashtra Transporters Strike : महाराष्ट्रातील सर्व ट्रान्सपोर्ट्सनी आज (दि. ५ मार्च २०२६) गुरूवारी मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. यात सर्व ट्रक, टॅक्सी, खासगी कॅब, टेम्पो, प्रवासी आणि स्कूल बस चालकांचा समावेश आहे. त्यांनी हा संप इ चलानचा गैरवापर आणि दंड वसुलीविरूद्ध पुकारला आहे.
ट्रान्सपोर्ट आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत सुरू असलेली ट्रान्सपोर्ट कर्मचाऱ्यांची बोलणी फिसकटल्यानंतर त्यांनी अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कृती समितीचे पदाधिकारी माणिक पटेल यांनी दिली.
८० हजार खासगी वाहनधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनने देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी देखील इ चलानबाबत तक्रार केली आहे. दरम्यान, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस या गुरूवारी सकाळी उपलब्ध असतील मात्र ते शुक्रवारपासून आपली सेवा थांबवतील असा इशारा स्कूल बस मालक संघटनेचे पदाधिकारी अनिल गर्ग यांनी सांगितलं.
टॅक्सी युनियन लीडर डी ए सालियान यांनी अनेक कॅब ड्रायव्हर देखील या संपात सहभागी होणार आहे. ते देखील इ चलान व्यवस्थेमुळं हैराण झाले आहेत. जो दंड आकारण्यात आला आहे तो अन्यायकारक आहे. काही दंडांची रक्कम तर दिवसाच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. मुंबई रिक्षा चालक संघटनेचे नेते थंपी कुरियन यांनी या संपात रिक्षा चालक देखील सहभागी होणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, पटेल यांनी सांगितलं की ट्रक, बस आणि टॅक्सी सेवांवर गुरूवार सकाळपासूनच परिणाम होण्यास सुरूवात होईल. गुरीवारी संध्याकाळी सर्व ट्रान्सफोर्टर हे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एकत्र जमतील. यावेळी गाड्या देखील आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरूवात होईल. जर गुरूवार सायंकाळपर्यंत सरकारनं कोणता निर्णय घेतला नाही तर आम्ही राज्यभरात बेमुदत चक्का जाम आंदोलन करणार आहोत.