मुंबई : मराठी माणूस संकटात आहे, तर तीस वर्षे कंचे खेळत होतात का, एवढी वर्षे महापालिकेत सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूू भर पाण्यात बुडा. कोणाला महापौरपदी बसवायला किंवा खुर्च्या तोडायला आम्हाला पालिकेत सत्ता नको आहे. कफनचोर आणि बेईमान लोकांचे राज्य संपवायचे आहे. मुंबईकरांचे हक्काचे सरकार महापालिकेत बसवायला आलो आहोत. मुंबईकरांचे जीवन बदलून दाखविणारे, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सरकारच महापालिकेत येणार आहे, महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेत फडकणार आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईतील प्रचारसभेत व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी पार्कवर आयोजित प्रचंड जाहीर सभेने मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीच्या महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता केली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्यासह महायुतीचे नेते, आमदार, खासदार, मुंबई महापालिकेतील महायुतीचे सर्व उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 38 मिनिटांच्या भाषणात ठाकरे बंधूंच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. मराठीचा मुद्दा, हिंदी सक्ती, अदानी समूहाची वाढती गुंतवणूक, मुंबई विमानतळ आदी मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंनी केलेल्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देत राजकीय हल्ले परतवून लावले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची चित्रफीत चालवली. दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची, त्यांच्यातील कलगीतुऱ्याचा व्हिडीओ दाखविल्यानंतर, आता यांना आपण उत्तर देण्याची गरज आहे का, असा प्रश्न करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काल जी सभा झाली त्यात पुन्हा तीच कारणे, तेच मुद्दे होते. कुणाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या.... बाप जरी आला तरी ही मुंबई हिसकावली जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावले. मराठी माणूस संकटात सापडल्याचा ठाकरेंच्या प्रचाराला उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणूस संकटात आहे, तर तीस वर्षे काय कंचे खेळत होतात का? याला जबाबदार कोण आहे? 25 वर्षे महापालिकांमध्ये खुर्च्या तोडण्याचे काम केले, एवढी वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूभर पानी में डुब मरो, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
शेवटची निवडणूक, मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक असे सांगितले जात आहे. मात्र, हा मराठी माणूस तो आहे ज्याने अटकेपार झेंडे लावले आहेत. आम्ही अन्याय सहन करणारे लोक नाहीत. ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई नाही, तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही हे पुन्हा सांगतो आहे. समोर बसलेली जनता म्हणजे मराठी आणि महाराष्ट्र आहे, असे देवेंद्र फडणवीस या सभेत म्हणाले.
हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे बंधूंच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती आहे. त्रिभाषा सूत्रामध्ये अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकायची मुभा आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय झाला होता. त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनीच घेतलेला निर्णय आमच्या काळात पुढे आल्यावर विरोध करत दुटप्पीपणा केला जात असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने यासंदर्भात केलेल्या निर्णयांची तारीखवार जंत्रीच समोर मांडली.
आधी म्हणायचे की हिंदी सक्तीसाठी आम्ही एकत्र आलो अन् आता काय तर आम्ही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आलो. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण? 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्रावर माशेलकर समिती तयार झाली. या समितीत उबाठाचे नेते विजय कदम देखील होते. या समितीत 18 लोक मराठी होते. आता या समितीचा अहवाल सर्वांनी पाहिला. पान नंबर 56 वर भाषेकरिता उपगट केला. त्यात इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी असे नमूद केले होते.
हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे. त्याला त्यांनीच मान्यता दिली होती, असे सांगतानाच यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हिंदुत्व तपासा म्हणत त्यांच्या आईवडिलांविषयी केलेल्या टिप्पणीवर देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. विकासावर बोलायचे असेल तर मर्द बनावे लागते. माझ्या आईवडिलांवर तुम्ही बोललात, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मी त्या बापाचा पोरगा आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता, मी त्या बापाचा पोरगा आहे, ज्याने आणीबाणीत दोन वर्षे तुरूंगवास भोगला, मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आयुष्यात संघर्ष केला, कधी संपत्ती कमावलीच नाही. पण, माझा बाप स्वर्गातून जेव्हा बघत असेल तेव्हा म्हणत असेल, माझे हिंदुत्व माझा मुलगा पुढे नेत आहे. पण, तुमचे पिताश्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातून बघत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल? की आपला मुलगा रशीद मामू सोबत बसला आहे, तेव्हा काय वाटेल त्यांना? असे संतप्त प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांच्या भाषणाची नक्कल केली होती. त्यांचा समाचारही फडणवीस यांनी घेतला. ते म्हणाले, काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. पण त्यांना हे समजायला पाहिजे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, चांगले भाषण करता येते, तुम्हाला ते पण येत नाही. मग तुमची काय अवस्था होईल. तर, आदित्य ठाकरेंशी समोरासमोर चर्चा करा, या उद्धव यांच्या आव्हानावर, आदित्यशी चर्चा करायची असेल तर आमची शेजारच्या वॉर्डातील उमेदवार शीतल गंभीरही पुरेशी आहे. उद्या दिवसभरात आदित्य ठाकरेंनी सांगावे आमच्याकडून शीतल गंभीर येईल, करुया चर्चा,असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
मुंबई विमानतळाची जागा अदानींना विकण्यासाठीच नवी मुंबई विमानतळ उभारल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोडून काढला. मी राजकारणात जन्मलोही नव्हतो तेव्हापासून नवी मुंबई विमानतळाची संकल्पना मांडली जात होती. उद्धव ठाकरे हे मातोश्री एकमधून मातोश्री दोन या बंगल्यात गेले, राज ठाकरे कृष्णकुंजमधून शेजारच्या शिवतीर्थमध्ये राहायला गेले, कारण त्यांना जागा कमी पडत होती. त्याच पद्धतीने, मुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, जागा कमी पडत होती. म्हणूनच नवी मुंबईत नवीन विमानतळ केले. अरे लंडनसारख्या शहरात तीन विमानतळ आहेत, मग माझ्या मुंबईत अपुरे विमानतळ का? इथेही आता मी तिसरे विमानतळ उभारणार आहे, मुंबई विमानतळाची क्षमता दीडपट करणार आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित तुम्हाला लंडनला जायची गरज वाटणार नाही, असे म्हणत ठाकरे बंधूंच्या लंडनवारीवर फडणवीसांनी टोला हाणला.
अदानी उद्योगसमूहाच्या वाढत्या गुंतवणुकीवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही फडणवीस यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. रोज मोदींना शिव्या देणाऱ्या ममतादीदी यांनी पण अदानीला बोलावले होते. केरळमध्ये तर कम्युनिस्ट, काँग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत, तिथेसुद्धा अदानीला बोलावून गुंतवणूक घेतली. आंध्र प्रदेशमध्ये पण गुंतवणूक घेतली. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन साहेबांना 15 हजार 500 कोटींची गुंतवणूक घेतली आहे. आता मला सांगा हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा आपण कुठल्या जमान्यात आहोत? तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहेत, मग इथे रोजगार कसा मिळणार? वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वप्न बघितले नाही. पण आम्ही स्वप्न बघितले आहे. यासाठी अदानी असो किंवा कोणी असो आम्ही त्यांचे स्वागत करू. आमचे ठरले आहे की आम्ही कोणालाही गैरफायदा घेऊ देणार नाही. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था तिस़ऱ्या क्रमांकावर आली. देशातील सर्व उद्योगांची ताकद वाढली. या काळात टाटा ग्रुपचे नेटवर्थ 664 टक्क्यांनी वाढले, अदानी ग्रुपचे 680 टक्क्यांनी, आदित्य बिर्ला ग्रुपचे 566 टक्के, सनफार्मा आपल्या मुंबईची कंपनी आहे, यांचा 1 हजार 552 टक्क्यांनी वाढला आहे. गोदरेजचा 409 टक्के, आता या सगळ्यांचे वाढले आहेत, त्याच्या तुलनेत त्यांनी सांगितलेला अदानींचा आकडा कमीच आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्हाला मराठी माणसाची चिंता नाही, मला चिंता आहे, त्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांसाठी इथे गुंतवणूक हवी आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कुणाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या.... बाप जरी आला तरी ही मुंबई हिसकावली जाऊ शकत नाही... ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई नाही, तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, हे पुन्हा सांगतो आहे. वडा-पावच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वप्न बघितले नाही. पण आम्ही स्वप्न बघितले आहे. यासाठी अदानी असो किंवा कोणी असो आम्ही त्यांचे स्वागत करू.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई तोडणार, मुंबई गुजरातला जोडणार म्हणतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे का? कुठेही काढला आणि कुठेही जोडला? असं काही होत नाही. दीड दोन वर्षांपूर्वी उद्योगपती कलानगरला कुणाच्या घरी गेले होते, बंद दाराआड चर्चा कुणाशी केली. तेच उद्योगपती नंतर शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? ही कसली डिनर डिप्लोमसी होती. कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का? आमच्यावर तुम्ही कसले आरोप करता. यह जनता है सब जानती है.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री