BMC Education Budget Pudhari
मुंबई

BMC Education Budget: महापालिकेचा 4,248 कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प; ‘मिशन सफल’द्वारे व्हिजन 2027ला गती

रोबोटिक्स, डिजिटल क्लासरूम, NCC ते ‘इको वॉरियर्स’पर्यंत सर्वांगीण विकासाचा आराखडा; 293 कोटींची वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

तंत्रज्ञान सक्षमीकरणासोबतच मातृभाषेचे जतन व संवर्धन हे दुहेरी उद्दिष्ट ठेवत महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‌‘व्हिजन 2027‌’ साठी ‌‘मिशन सफल‌’ हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना 4 हजार 248.08 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 293 कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी 3 हजार 955.64 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प होता.

‘मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत येणारे प्रत्येक बालक यशस्वी होऊ शकता, फक्त योग्य दिशा आणि संधी हवी‌’ या विश्वासातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक सबलीकरणापासून कला-संस्कृतीपर्यंत आणि जीवनकौशल्यांपासून सामाजिक जाणीवेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक आराखडा या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

‌‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020‌’ च्या धर्तीवर रोबोटिक्स, सायबर साक्षरता, आर्ट एक्सलन्स सेंटर, डिजिटल क्लासरूम आणि मोफत शैक्षणिक सुविधा यांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. महसुली उत्पन्न व खर्च दोन्ही 3 हजार 758.08 कोटी रुपये इतके संतुलित ठेवण्यात आले आहेत. तर भांडवली कामांसाठी 490 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी ‌‘इको वॉरियस‌’ हा नवीन उपक्रम राबवण्यासाठी 2.40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थी शाश्वत जीवनशैली, कचऱ्यापासून वस्तू बनवणे, सीलबॉल्स तयार करणे आणि हर्बल गार्डन विकसित करणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींतून पर्यावरण रक्षण करू शिकणार आहेत.

आता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मागणीही यंदा पूर्ण केली आहे. प्राथमिक प्रमाणे माध्यमिक वर्गातील नववीच्या विद्यार्थ्यांनाही सहलीला जाता येणार आहे. यासाठी विशेष तरतूद केली आहे.

इतर महत्त्वाच्या तरतुदींमध्ये शाळांमधील ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणासाठी 5 कोटी रुपये, संगीत वाद्यांच्या खरेदीसाठी 1.35 कोटी रुपये आणि 1 हजार 98 बालवाड्यांच्या अनुदानासाठी 20.33 कोटी रुपयांचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपये थेरपी साहित्यासाठी आणि 2 हजार 830 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 25 लाख रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय, 12 हजार 148 विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यासाठी 5.26 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शाळांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी, डिजिटल सुविधा, प्रयोगशाळा उभारणी, सुरक्षा व्यवस्था आणि शैक्षणिक साधनसामग्री यांचा समावेश अर्थसंकल्पात आहे.

पालिका आपल्या शैक्षणिक सुविधांचा विस्तार करत असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंधेरीतील कोंडिविटा भागात नवीन सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे आगामी वर्षात इतर बोर्डाच्या 19 शाळा होणार आहेत.

सध्या मुंबईत महापालिकेच्या मराठीसह आठ माध्यमाच्या 931 असून त्यामध्ये 2 लाख 76 हजार 115 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुले 1 लाख 41 हजार आणि मुली 1 लाख 35 हजार आहेत.

काय आहे सफल मिशन...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‌‘सफल‌’ हा नवीन कार्यक्रम आहे. ‌‘सफल‌’ म्हणजे स्ट्रेंथ , ॲक्टिव्हिटी, फ्युचरिस्टिक, ॲम्बिशिअस आणि लर्निंग हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या मिशन संपूर्णचा विस्तार केल्याचे म्हटले आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात केवळ गुणपत्रिका पुरेशी नसते हे लक्षात घेवून पालिका शाळात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना संवादकौशल्य, नेतृत्व, सर्जनशीलता, शारीरिक क्षमता, सामाजिक जाणीव आणि समस्या सोडवण्याची क्षमता हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगत हे मिशन या सर्व घटकांना एकत्र गुंफणारे एक समन्वित मॉडेल या अर्थसंकल्पात मांडले आहे.

शारीरिक क्षमता : यामध्ये विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) हा नवीन उपक्रम सुरू केला जाईल. इयत्ता 8 वी आणि 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पथके तयार केली जातील.

सहशालेय उपक्रम : स्काऊट आणि गाईड चळवळीला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रपती पुरस्कारांसाठी तयार केले जाईल.

भविष्याभिमुख संगीत : विद्यार्थ्यांच्या सांगीतिक कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत स्पर्धा आणि संगीत सप्ताहाचे आयोजन केले जाईल.

महत्त्वाकांक्षी कला : किमान 150 शाळांमध्ये कलावर्गांची निर्मिती केली जाईल आणि कलेचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी 3 कला उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील.

कार्यानुभव : विद्यार्थ्यांना कृतीकेंद्रीत शिक्षणाद्वारे समाजोपयोगी उत्पादने तयार करण्याचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

‌‘सफल‌’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थी केवळ गुणांच्या चौकटीत मोजता येत नाही. काही विद्यार्थी कला, संगीत किंवा क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात. त्यामुळे ‌‘आर्ट एक्सलन्स सेंटर‌’ उभारून चित्रकला, संगीत, नृत्य यांसारख्या क्षेत्रांना चालना देणार आहोत.
राजश्री शिरवडकर, अध्यक्ष, शिक्षण समिती

तरतूदी अशा (कोटींमध्ये)... शाळा दुरुस्ती व पुनर्बांधणी : 340 हाऊसकीपिंग : 180.27 सीसीटीव्ही कॅमेर : 42 सायबर साक्षरता : 23.60 डिजिटल क्लासरूम (प्राथमिक) : 23.38 टॅब वितरण (माध्यमिक) : 21.73 झोनल कॉन्ट्रॅक्टर नियुक्ती : 16.52 विज्ञान पार्क उभारणी : 5 इंग्रजी प्रयोगशाळा (माध्यमिक) : 3.87 खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा : 3 जादुई पिटारा (इयत्ता 1-2) : 2 कार्यानुभव : 1.50 डिजिटल क्लासरूम : 1.08

कौशल्य विकासवर भर

डिजिटल साक्षरता : 7,953 डिजिटल वर्गखोल्या चालवण्यासाठी शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण.

स्टेम आणि रोबोटिक्स: 175 शाळांमधील शिक्षकांना रोबोटिक्स लॅब हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण.

इंग्रजी संभाषण: 279 माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी उच्चार आणि संभाषण कौशल्य विकास कार्यक्रम.

सायबर साक्षरता: 20 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेटचे धडे.

डिजिटल क्लासरूम: 7,953 वर्गखोल्यांत इंटरॅक्टिव्ह पॅनल्स.

टॅब वितरण: इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना टॅब.

इंग्रजी भाषा लॅब: 279 शाळांमध्ये संभाषण कौशल्य विकासावर भर.

खगोलशास्त्रीय लॅब: 40 नवीन शाळांमध्ये अंतराळ विज्ञानाचे धडे.

विज्ञान पार्क: दोन शाळांमध्ये प्रात्यक्षिकांवर आधारित पार्क.

जादुई पिटारा: इयत्ता 1 ली व 2 रीच्या मुलांसाठी खेळातून शिक्षण.

शाळा दुरुस्ती: 479 शाळांची पुनर्बांधणी व दुरुस्ती.

स्वच्छता : 469 शाळांच्या देखभालीसाठी विशेष तरतूद.

सुरक्षा: सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मोफत साहित्य: गणवेश, वह्या आणि साहित्य यंदाही देणार.

उपस्थिती भत्ता: मुली आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT