कोल्हापूर

ठाण्याच्या दाढीवाल्याने धर्मवीर दिघेंचा वारसदार समजू नये : सत्यजित पाटील-सरूडकर यांचा घणाघात

अविनाश सुतार

सरुड : पुढारी वृत्तसेवा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. मात्र ठाण्याच्या दाढीवाल्याने स्वतःला धर्मवीर आनंद दिघेंचा वारसदार समजू नये. ईडीच्या भीतीनेच बंडखोरांच्या या म्होरक्याने शिवसेनेशी गद्दारी केली आहे. माध्यमांमधून कितीही सोंग वटविण्याचा प्रयत्न केलात, तरी जनतेच्या मनात तुम्ही खलनायकच ठरला आहात, असा घणाघाती हल्लाबोल माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा करिष्मा पहिल्यापेक्षा दहापटीने वाढला असून सर्वच गद्दार बंडखोर या करिष्म्यामध्ये नेस्तनाबूत होतील, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तविले.

सरुड (ता. शाहूवाडी) येथे शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिक, कार्यकर्त्यांना बुधवारी (ता. १७) शिवसेना पक्ष सदस्यता नोंदणी फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे प्रमुख उपस्थित होते.
सत्यजित पाटील म्हणाले, महाराष्ट्र आणि मराठ्यांच्या भल्यासाठी ठाकरे कुटुंबियांच्या तीन पिढ्या खपल्या आहेत. हे प्रत्येक मराठी माणूस जाणून आहे. संयमी पक्षनेतृत्व उद्धव ठाकरे यांना गद्दारांनी दगाच दिला आहे. गावातील सोसायटीचा सदस्य फोडायची गोष्ट अशक्य असताना शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले आमदार, खासदार, मंत्री संत्री गण हे एकाएकी पक्ष सोडतात. गौण कारणे देऊन बंडखोरीचे समर्थन करतात, पण यामागे अनेक दिवस मोठे कटकारस्थान शिजले असल्याचा ठाम दावाही सरूडकर यांनी केला.

शिवसैनिक एकदा पेटून उठला की शिवसेना सोडणाऱ्यांची काही खैर नसते, हा आपल्याला वडिलांनी सांगितलेला अनुभवही त्यांनी निसंकोच कथन केला. वेळप्रसंगी कटकारस्थानात धनुष्यबाण हिरावला गेला, तरी आपण ठाकरे यांच्या नावानेच निवडणुकीत उतरणार आहे. या लढाईत आयुष्यातून उठलो, तरी चालेल परंतु उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी करणार नाही, अशी ठाम भूमिका व्यक्त करताना सरूडकर काहीसे भावनिक झाले होते. पुढील काळात शिवसैनिकांना संघर्ष करावा लागू शकतो. यामुळे दबाव किंवा आमिषाला बळी पडून इमान विकू नका, मोडेन पण झुकणार नाही, असा पक्का इरादा घेऊन पक्ष कार्यात झोकून द्या, असे आवाहनही सरूडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, देशात जोपर्यंत हिंदू आहेत, तोवर कोणी कितीही शड्डू ठोकला, तरी शिवसेनेला संपविण्याचे कटकारस्थान यशस्वी होणार नाही. कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी अस्वस्थ झालेले तमाम शिवसैनिक गद्दारांना गाडण्यासाठी आतुर झाले आहेत. येथील गद्दार खासदार हे आत्तापासूनच माजी खासदार म्हणूनच वावरत आहेत. सर्व गद्दारांना उभ्या आयष्यात भागव्याचा शाप सहन करावा लागणार आहे. कृतघ्नपणाची हद्द ओलांडून शिवसेना पक्ष बळकावण्याचा बंडखोरांचा वाढलेला उन्माद आणि राक्षसी महत्वाकांक्षा जनतेला पटलेली नाही. याउलट माजी आमदार सरूडकर यांनी कठीण काळातही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याच्या घेतलेल्या ठाम भूमिकेचे यावेळी जिल्हाप्रमुखांनी कौतुक केले. सदस्य नोंदणीबाबत शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शनही केले.

यावेळी जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी विचार मांडले. माजी सभापती विजयराव खोत, डॉ. स्नेहा जाधव, अॅड. विजय पाटील-उत्रेकर, अमरसिंह पाटील, तसेच दोन्ही तालुकाप्रमुख, पदाधिकारी, गटाचे सरपंच, सदस्य, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकनाथ शिंदे तुमचे आभारच..!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शाहूवाडी-पन्हाळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. हाच धागा पकडून, 'लोकांच्या मनात अद्यापही राग धुमसत असल्याची ही साक्ष आहे. एरवी शिवसैनिकांना एकत्र करण्यासाठी कष्ट करावे लागत असत. मात्र शिवसैनिकांना तापविले आणि रिचार्ज केले याबद्दल एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार. बंडखोरांचा 'उठावदार'असा उल्लेख करून सरूडकर यांनी उपहासात्मक टोलाही लगावला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT