पुढारी ऑनलाईन डेस्क : ही स्टोरी आहे, एका महाठगाची आणि त्याच्या बरोबर मैत्री केल्याने अडचणीच्या भोवर्यात सापडलेल्या अभिनेत्रीची. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही स्टोरी आहे घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या दोघांची. आज दोनशे कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline & money laundering ) हिलादेखील आरोपी बनविले आणि सुकेशबरोबरील तिच्या नात्याची आणि आर्थिक व्यवहारांची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेवूया या दोघांमधील नाते आणि आर्थिक व्यवहाराविषयी…
बेंगळूरमधील एका मध्यमवर्गीय घरात १९८९मध्ये सुकेशचा जन्म झाला. सुकेश चंद्रशेखर त्याला बालाजी नावानेही ओळखतात. त्याचे भांडवल काय तर? बोलण्यात हा प्रचंड हुशार. आपल्या प्रभावी बोलण्याने तो सर्वांनाच मोहित करायचा. अल्पवयीन असल्यापासून त्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणुकीला सुरुवात केली. बंगळूरमधील हजारो लोकांची त्याने कोट्यवधी रुपयांना फसवणूक केली होती.तर हाच प्रकार त्याने चेन्नईतही केला. त्याने आपल्या प्रभावी बोलण्याने अनेकांना गंडा घातला. अभिनेत्री लीना मारीया पॉल ही त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केले.
शासकीय कार्यालयातील अधिकार्यांना तो स्वत:ची ओळख राजकीय नेता अशी करुन देत असे. त्याने तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरण यांची निवडणूक चिन्ह देतो, असे सांगून ५० कोटींची फसवणूक केली होती. याचप्रकरणी २०१७मध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली होती. यानंतर त्याची रवानगी तिहार कारागृहात झाली. यावेळी त्याच्याकडून १ कोटी ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे कारागृहातूनच तो हवाला रॅकेट चालवत होता, असेही ईडीच्या तपासात स्पष्ट झाले होते. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात 'ईडी'ने दोषारोपपत्र दाखल केले . या दोषारोपपत्रात सुकेश चंद्रशेखर याच्यासह त्याची पत्नी लीना मरिया पोल आणि अन्य सहा जणांची नावे आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
'ईडी'ने दोषारोपपत्रात म्हटलं आहे की, सुकेश याने अभिनेत्री जॅकलिनच्या संपर्कात येण्यासाठी डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१मध्ये प्रयत्न केले. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शान मुथिल याने सुकेश हा केंद्रीय गृह मंत्रालयातील महत्वाचा व्यक्ती असल्याचे सांगितले. तसेच त्याचा मोबाईल नंबरही जॅकलिनला शेअर केला होता. सुकेशने जॅकलिन फर्नांडिसबरोबर मैत्री करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑफिसचा नंबरलाच 'स्पूफ' केले होते. 'स्पूफ' म्हणजे, फोनची रिंग वाजल्यानंतर फोन करणार्यांना खरा नंबर दिसत नाही तर अन्य नंबर दिसतो. जॅनलिनबरोबर मैत्री करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑफिसचा नंबरलाच सुकेशने 'स्पूफ' केले होते, असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
जॅकलिनशी ओळख करुन देताना 'सन टीव्ही'चा मालक असल्याचे सुकेश याने सांगितले होते. तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नातेवाईक असल्याचेही त्याने म्हटलं होतं. मी तुमचा मोठा फॅन आहे. 'तू हॉलीवूडची अभिनेत्री एंजेलीना जोली सारखीच आहेस. तुला घेवून मी 'सुपरहिरो' चित्रपटाची सीरीज करणार आहे. ५०० कोटी बजेट असणार्या या चित्रपटात तुझी भूमिका मुख्य असेल, असे आमिष सुकेशने जॅकलिनला दाखवले होते. चंद्रशेखर याने आपलं नाव 'शेखर रत्न वेला' असे सांगितले होते, असे जॅनलिनने 'ईडी'ला दिलेल्या जबाबात म्हटलं होते.
सुकेश याने आपले वकील अनंत मलिक यांना कारागृहातून एक पत्र लिहिले होते. हे पत्र मलिक यांनी माध्यमांना दिले होते. त्यात म्हटले होते की, माझ्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांशी जॅनलिन व अन्य बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा कोणाताही संबंध नाही, असा दावा त्याने केला होता. तसेच जॅनलिनबरोबर रिलेशनशिपमध्ये होता असा दावाही त्याने केला होता. तर याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसचा जबाब दोनवेळा नोंदविण्यात आला आहे. चंद्रशेखर ओळख करुन देताना आपलं नाव 'शेखर रत्न वेला' असे सांगितले होते, असे जॅनलिनने आपल्या जबाबात म्हटलं होते.
ईडी'च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्यफे ५३ लाखांचा घोडा, ९ लाख रुपयाचं पार्शियन माजंर याच्यासह विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरीचा समावेश आहे. त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर 'ईडी'ने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला होता.
मूळची श्रीलंकन नागरिक असणार्या जॅकलिनने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने टीव्ही रिपोर्टर म्हणूनही काम केले. २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धा जिंकत मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. मूळची श्रीलंकन नागरिक असणार्या जॅकलिनने २००९मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपट होता अलादीन. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर तिने अनेक जुडवा २, हाउसफूल २. बागी २. मिसेज सीरियल किलर आदी चित्रपटात काम आहे.तसेच अनेक ख्यातनाम ब्रँण्डच्या जाहिरातीमध्ये मॉडल म्हणूनही तिेने काम केले आहे. मागील १३ वर्ष जॅकलिन बॉलीवूडमध्ये सक्रीय आहे. हिट चित्रपटांपेक्षा तिच्या फ्लॉप चित्रपटांची यादीच लांबलचक आहे. तिचे ९ चित्रपट 'फ्लॉप' झाले आहेत.
मीडिया रिपोर्टसनुसार, जॅकलिनची एकूण संपत्ती ही १० मिलियन डॉलर ( 74 कोटी रुपये ) इतकी आहे. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. २०१९ मध्ये तिचे वार्षिक उत्पन्न ९.५ कोटी रुपये इतके होते. विशेष म्हणजे, त्यावर्षी नेटफिक्सवर तिचा ड्राइव्ह या एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनय व्यवसायाबरोबरच श्रीलंकेतील कोलंबो येथे जॅकलिन रेस्टारंट व्यवसायही चालवते. तिचे मुंबईत स्वत:चे घर आहे. तसेच श्रीलंकेतील एक बेट तिच्या नावावर आहे. या बेटावर तिचे रेस्टॉरंटही आहे.