राधानगरी: धरणाचे चार स्वयंचालित दरवाजे खुले झाले आहेत.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood : पंचगंगा 23 फुटांवर; दोन दिवसांत पातळी 11 फुटांनी वाढली

राधानगरीचे चार दरवाजे खुले; 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळपासून कोसळधारा सुरू होत्या. पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत तब्बल 11 फुटांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत गगनबावडा, राधानगरी, आजर्‍यात सर्वाधिक पाऊस झाला असून 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले झाले आहेत. धरणातून सध्या 7212 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवारी (दि. 26) ऑरेंज अलर्ट दिला आहे.

जिल्ह्यासह शहरात शुक्रवारी रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारीही दिवसभर पावसाचा जोर होता. दुपारी पावासाचा जोर वाढला होता. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. दोनच दिवसांत जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फुटांवर होती. यामध्ये 4 फूट 8 इंचाची वाढ होऊन शनिवारी रात्री 9 वाजता पंचगंगेची पातळी 16 फूट 8 इंचांवर पोहोचली. रविवारी पातळीत सुमारे सात फुटांची वाढ झाल्याने रात्री 9 वाजता पातळी 23 फुटांवर गेली होती.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 58.4 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर हातकणंगले 21.4, शिरोळ 13.1, पन्हाळा 29.3, शाहूवाडी 33.9, राधानगरी 42.6, गगनबावडा 58.4, करवीर 27.1, कागल 28.6, गडहिंग्लज 21.4, भुदरगड 37.3, आजरा 53.3, चंदगड 39.7 येथे पाऊस झाला. शहरात 27 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत राधानगरी, वारणा, दूधगंगा, कासारी, कुंभी, कडवी, पाटगाव, चित्री, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय आजरा तालुक्यातील गवसे, आजरा व गगनबावड्यात अतिवृष्टी झाली.

राधानगरी, कुंभी, वारणेतून विसर्ग सुरू

राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा रविारी पहाटे खुला झाला. त्यानंतर 3, 4 व 5 हे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यातून 7212 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून विद्युत गृहातून 1000 विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कुंभी धरणाच्या वक्रद्वारातून 350 व विद्युतनिर्मिती केंद्रातून 300 असा एकूण 650 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

खासगी मालमत्तांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान

पावसामुळे गेल्या 24 तासांत 20 खासगी मालमत्तांचे 3 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 15 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली तर 5 जनावारांच्या गोठ्यांचीही पडझड झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती विभागाकडे झाली आहे.

पचंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ

तारीख पाणी पातळी

23 ऑगस्ट : 12 फूट

24 ऑगस्ट : 16.8 फूट

25 ऑगस्ट : 23 फूट

20 बंधारे पाण्याखाली

राजाराम, शिंगणापूर, रुई, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, राजापूर, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, वाघापूर, बस्तवडे, कुरणी, यवलूज, निळपण, दत्त्तवाड, कळे हे 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT