Kolhapur Flood | शिरढोणमध्ये पूरग्रस्त वाऱ्यावर; अन्न, पाण्याविना हाल

अद्याप प्रशासनाची काडीचीही मदत नाही
Kolhapur Flood
शिरढोण (ता. शिरोळ) येथील स्थलांतरित कुटुंबfile photo
Published on
Updated on
बिरु व्हसपटे

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील स्थलांतरित झालेल्या १७ कुटुंबाना गेल्या पंधरा दिवसापासून प्रशासनाने अन्न, पाणी आणि जनावरांना चारा, निवारा यासाठी काडीचीही मदत केलेली नाही. त्यामुळे स्वखर्चाने उदरनिर्वाह करणाऱ्या पूरग्रस्तांची फरफट होताना दिसत आहे. शिरढोण मधील पूरबाधित नागरिकांना सरकारने सरसकट सानुग्रह अनुदान व इतर मदत द्यावी, अशी मागणी स्थलांतर झालेल्या १७ कुटुंबातील पूरग्रस्तांनी दैनिक पुढारीशी बोलताना केली आहे.

यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील नागरिकांवर अस्मानी संकट कोसळले आहे. मदत न मिळाल्याने सुलतानी संकटानाही तोंड द्यावे लागत असल्याचे पूरग्रस्त संताप व्यक्त करत आहेत. येथील माळभागातील जिल्हा परिषद कुमार शाळेत पूरग्रस्त कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्यांना अन्न नाही, पाणी नाही तसेच जनावरांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे पूरग्रस्त प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. तात्काळ आम्हाला मदत करावी, अशी मागणी करत आहेत. केवळ महापूर काळात नदीकाठावरील कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली. मात्र पूरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पूरग्रस्तांचे अतोनात हाल होत आहेत. केवळ मदत देण्याचे आश्वासन मिळत असल्याने पूरग्रस्त हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, गावात शासनाचा पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पूरग्रस्तांना जनावरांच्या औषध उपचारासाठी खासगी डॉक्टरांना खर्च देऊन उपचार करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चातूनच सुरक्षित स्थळे गाठली आहेत. पण आपत्ती काळात प्रशासनाने नागरिकांची सोय करणे गरजेचे असताना प्रशासनाकडून काडीचीही मदत झालेली नाही. सरकारकडून जाचक अटी, शर्ती न लावता सरसकट स्थलांतरित नागरिकांना तातडीची मदत जाहीर करून सानुग्रह अनुदान वाटप करण्याची मागणी पूर बाधित कुटुंबे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news