कुरुंदवाड : कृष्णा पंचगंगा नद्या पात्राच्या दिशेने रवाना झाल्या असून पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल खुला झाला आहे. शिरढोण टाकवडे इचलकरंजीचा मार्ग सुरू झाला आहे. तर हेरवाड-अब्दुललाट हा मार्गही खुला झाला आहे. महापुराच्या काळातही रसायनिक पाणी सोडल्याने हजारो एकर शेतीवर आणि रस्त्यावर रासायनिक पाण्याचे चून्याने रंगवल्यासारखे पांढरे डाग पडले आहेत. शेतात आणि रस्त्यावर विषारी दुर्गंधी पसरली आहे.
आधीच महापुराने होरपळलेल्या शेतकऱ्याला आता या रासायनिक पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी प्रदूषित घटकावर शासनाने उपाय करावा, अशी मागणी होत आहे. कृष्णा पंचगंगा नद्यांनी आपले रुद्र रूप धारण करून शहराच्या दिशेने वाटचाल करत या नद्यांच्या काठावर येणाऱ्या गावांना विळखा देत बेटाचे स्वरूप आणले होते. तालुक्यातील तेरवाड शिरोळ आणि राजापूर हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले होते ते आजही पाण्याखालीच आहेत. दोन दिवसात महापुराचे बरेच पाणी नदीपात्रात गेले असून आज पहाटे कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल खुला झाल्याने इचलकरंजी टाकवडेकडे जाणारा हा मार्ग खुला झाला आहे. तर हेरवाड दरम्यानचा अब्दुललाट रस्त्यावर सुतार ओढ्यात पाणी होते. हे पाणी देखील पात्रात गेल्याने हा रस्ता देखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
महापुराच्या पाण्यात प्रदूषित घटकांनी पंचगंगा नदीत आपले रासायनिक पाणी सोडले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची पाहणी केली होती. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर अब्दुललाट हेरवाड-तेरवाड नांदणी शिरढोण आणि कुरुंदवाड या परिसरातील पंचगंगा नदीकाठच्या उसावर रासायनिक पाण्याचे लोकरी माव्यासारखे पांढरे डागाने पूर्ण ऊस पांढरे दिसत आहे. पाणलोट रस्ते त्यासह ज्या मुख्य रस्त्यावर पंचगंगेचे पाणी आले होते, ते रस्ते चुन्याने रंगवल्यासारखे पांढरे झाले आहेत.
उन्हाळ्यात हिवाळ्यात पंचगंगा प्रदूषणाविरुद्ध शेतकरी नेहमी लढा देत असतात आता पावसाळ्यातही या पंचगंगेच्या पाण्यात रासायनिक पाणी सोडून या लाल पाण्यालाही रासायनिक पांढरा रंग देण्याचा प्रकार प्रदूषित घटकांकडून सुरू असून यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सन २०१९ आणि २०२१ सालच्या महापुरात ऊस बुडाला होता. त्यावेळी बुडालेल्या उसातून काही प्रमाणात चांगला असलेला तोडून तो स्वच्छ करून पशुधनासाठी वैरण म्हणून गोरगरिब शेतमजूर आणि दुग्ध उत्पादन करणाऱ्या पशुधन मालकांना विनामूल्य दिले होते. पंचगंगेच्या रासायनिक पाण्यामुळे सदरचा ऊस रासायनिक झाल्याने तो वैरणसाठी म्हणून नाही तर त्याचे जळणच झाले आहे.