शिरढोण : शिरढोण व टाकवडे, नांदणी (ता.शिरोळ) परिसरात पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी तब्बल अठरा दिवस राहिले होते. त्यामुळे चौदाशे हेक्टर क्षेत्रातील पिके अक्षरशः कुजली आहेत. कुजलेल्या पिकांना प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात भाजीपाला तसेच अन्य पिकांचा समावेश आहे. शेतकरी वर्गाचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याने दुबार पेरणीचे संकट उभारले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अठरा दिवसांनी पंचगंगा याठिकाणी नदीपात्रात विसावल्याने पुरबाधित स्थलांतरित कुटूंबे डोळ्यात पाणी घेऊन घराकडे परतली आहेत.
काही शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेल्या पिकांना फटका बसून नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. टाकवडे याठिकाणी पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून शिरढोण, नांदणी येथील शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अठरा दिवसांपासून शिरढोणसह टाकवडे येथील शेतीसह काही वसाहतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरढोण येथील कुरुंदवाड रस्ता भागातील यमगर मळी, पाणदारे मळी भागात असलेल्या शेती पिकात सुमारे दहा ते पंधरा फूट पाणी साचलेले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, स्थलांतरित लोकांचे पंचनाम्याचे काम सुरू होणार आहे.
शिरढोण, टाकवडे, नांदणी ठिकाणी भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरबाधित शेती क्षेत्रात दहा ते पंधरा फूट पाणी होते. सध्या पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळेल, या आशेवर येथील पुरबाधित शेतकरी आहे.