चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बहुतांश भागात काल (शनिवार) दिवसा आणि रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले भरभरून वाहू लागले आहेत. नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव पुन्हा ओव्हरफ्लो झाला आहे. ब्रह्मपुरी लगतच्या भूती नाल्यावर पुराचे पाणी आल्याने ब्रह्मपुरी-वडसा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातून वाहत असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. 15 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने आगस्ट महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्प तुडुंब भरले. नदी नाल्यांना भरभरून पाणी वाहू लागले. संततधार पावसामुळे यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील शेत पिकांना मोठा तडाका बसला. शेकडो एकर मधील पिकांचे संततधार पावसामुळे नुकसान झाले. आठ दिवसांपासून विसावलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
हवामान खात्याने चार दिवसांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस पुन्हा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. काल (शनिवार) दिवसा व रात्री नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, चिमूर परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल दिवस आणि रात्रीच्या पावसामुळे नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव पुन्हा ओवरफ्लो झाला आहे.
सांडव्यावरून भरभरून पाणी वाहू लागले असल्यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने घोडाझरी तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर कालच्या पावसामुळे पुन्हा दुसऱ्यांदा तो ओव्हरफ्लो झाल आहे. सध्या घोडाझरी तलावावर पर्यटकांना पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ब्रह्मपुरी शहरालगतच्या भूती नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी-वडसा मार्ग बंद झाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामध्ये भूती नाल्यावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे ये-जा करण्याकरिता तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु वारंवार येणाऱ्या पुरामुळे ब्रह्मपुरी-वडसा मार्ग बंद राहत आहे. वडसेला जाण्याकरिता नागरीकांना ग्रामीण भागातील मार्गाचा वापर करावा लागत आहे. हवामान खात्याने काल शनिवार आणि आज रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित केला आहे. काल जोरदार पाऊस कोसळला आहे, तर आज सकाळपासून काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत.