Kolhapur Flood : अखेर मुदाळतिट्टा-निपाणी वाहतूक सुरु ..!

वेदगंगेच्या महापुराचे पाणी उतरले
Finally Mudalattitta-Nipani traffic started..!
अखेर मुदाळतिट्टा-निपाणी वाहतूक सुरु ..!Pudhari Photo
Published on
Updated on

मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील

गेले पंधरा दिवस वाहतुकीसाठी बंद असलेला मुदाळतिट्टा-निपाणी मार्ग आज (रविवार) नऊ वाजता सुरू झाला. वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाणीपात्रात घट झाल्याने मुरगुड-निढोरी दरम्यान स्मशान शेडजवळ रस्त्यावर आलेले पाणी उतरले आहे. त्यामुळे येथून वाहतूक सुरू झाली आहे. रविवार अमावस्‍या यात्रा असल्याने आदमापूर व मेतके येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्ता रिकामा झाल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. गेले पंधरा दिवस कुर मडिलगे गंगापूर चिमगाव अशी वाहतूक झाल्याने या रस्त्याची पूर्ण वाताहात झाली आहे.

गेले पंधरा दिवस मुरगुडच्या स्‍मशान शेडजवळ रस्त्यावर वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे मुदाळतिट्टा मुरगुड या महत्वाच्या राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मुरगुड परिसरात झालेल्या प्रजन्य वृष्टीमुळे सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. त्यामुळे तेथूनही बस वाहतूक बंद करण्यात आली होती.

यामुळे शाळा कॉलेजला विद्यार्थी संख्या कमी होती. मुदाळतिट्टा कूर मडीलगे गंगापूर चिमगाव मुरगुड निपाणी असा वाहतूक मार्ग सुरू होता, पण राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराकडून कमी प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. मुरगूड-कागल मार्गावर सिदनेर्ली नदी किनाऱ्या जवळ रस्त्यावर पाणी आल्याने कागल मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला होता. पर्यायी भडगाव पाटी, मळगे, आप्पाचीवाडी, कागल अशी वाहतूक सुरू होती. पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याने या वेळच्या अमावस्या यात्रेसाठी गर्दी झाली नाही. पण आज रविवारी सकाळी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे आदमापूर मेतकेकडे येजा करण्यासाठी भाविकांची सोय झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news