अकिवाट (ता. शिरोळ) येथे आज (दि. २) ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून गेले.  Pudhari News Network
कोल्हापूर

Kolhapur Flood | पूरबळी : १९ वर्षातील महापुरातील अकिवाट येथील तिसरी दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा
जमीर पठाण

कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी सकाळी दस्तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून गेले. सहा जण सुखरूप बाहेर आले, तर दोघे पाण्यात वाहून गेले. त्यांची शोध मोहीम सुरू आहे. सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरपंच पती सुहास शामगोंडा पाटील असे त्यांचे नाव आहे. (Kolhapur Flood)

या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह एनडीआरएफ पथक, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मीसह रेस्क्यू फोर्स तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली. (Kolhapur Flood)

खड्ड्यात ट्रॅक्टरचे मोठे चाक अडकून ट्रॅक्टर पलटी

अकिवाट ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर आहे. दरम्यानच्या रस्त्यावर कृष्णा नदीचे पुराचे पाणी आले आहे. या पाण्यातून सरपंच पती सुहास पाटील, तंटामुक्त अध्यक्ष श्रेणीक चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, अरुण कोथळे हे चौघेजण पाणीपुरवठ्य़ाची मोटार सुरू करण्यासाठी जात होते. त्यावेळी बस्तवाड हद्दीत केळीची शेती असलेले आण्णासाहेब हसुरे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालक व अझहर आलासे, अंगद मोहिते (दोघे. रा. खिद्रापूर, ता. शिरोळ) हे चौघेजण जात असताना त्यांनी या चौघांना ट्रॅक्टरमध्ये बसा पलीकडे सोडतो, असे सांगितले. ते चौघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले. ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे गेल्या नंतर पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याची साईडपट्टी खचून निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टरचे मोठे चाक अडकून ट्रॅक्टर पलटी झाला. (Kolhapur Flood)

यांत्रिक बोटीच्या पथकाने शोध मोहीम सुरू

पाण्याच्या प्रवाहामुळे ६ जण बस्तवडच्या दिशेने वाहू लागले. या सहा जणांना प्रसंगावधान राखून ग्रा.प.कर्मचारी सागर माने, मासेमारी करणारे आनंदा बागडी, ओंकार बागडी आणि अरुण कांबळे या चार जणांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. तर आण्णासाहेब हसुरे, माजी जि. प. सदस्य बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ते दोघे शार्दुल रजपूत यांच्या शेतातील झाडाला पकडून थांबले असल्याचे काहींनी माहिती दिली. त्यानंतर एनडीआरएफ पथक, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या १० हून अधिक यांत्रिक बोटीच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. (Kolhapur Flood)

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

बचावलेले सरपंच पती सुहास पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यातून त्यांना उचलून अकिवाट हद्दीत आणून 108 रुग्णवाहिकेतून दतवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच जण सुखरूप आहेत. तर दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.त्यांची शोध मोहीम सुरू आहे. (Kolhapur Flood)

घटनास्थळी पालकमंत्र्यांची भेट

या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, प्रांत अधिकारी मोसमी बर्डे, माजी आमदार उल्हास पाटील, संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली. या प्रकारामुळे अकिवाट गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी उशिरा सरपंच पती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरपंच पती पाटील यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देणार - पालकमंत्री मुश्रीफ

सरपंच पती सुहास पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून भरीव मदत देणार आहे. जखमींवर चांगले उपचार करण्यात आले आहेत. ते सुखरूप आहेत. जे दोघे वाहून गेले आहेत, ते सुखरूप यावेत, अशी प्रार्थना करतो, असे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

गावच्या हितासाठी सरपंच पती अंतिम श्वासापर्यंत कार्यरत राहिले.

अकिवाटच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील गावाचा ३ दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत सुरू करण्यासाठी जात होते. महापुरात वाहून जाताना बचावले आणि उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली. गावचे हित जोपासत अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्य करत राहिले.

कर्नाटक राज्यातील कल्लोळ पर्यंत शोध मोहीम

वाहून गेलेले अण्णासाहेब हसुरे, इकबाल बैरागदार यांच्या शोधासाठी एनडीआरएफ पथक, रेस्क्यू फोर्सतर्फे अकिवाट ते राजापूर बंधारा तसेच जुगुळ-मंगवती, कल्लोळ पर्यंत शोध मोहीम सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होती. मात्र, त्यांचा पत्ता लागला नाही.

झाडाला पकडून थांबल्याचे निदर्शनास आले अन् निघाली कडब्याची पोती

ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर पाण्यातून वाहून गेलेले दोघे शार्दूल रजपूत यांच्या शेतातील झाडाला दोघेजण पकडून थांबल्याची चर्चा होती. तत्काळ एनडीआरएफ पथक आणि रेस्क्यू फोर्स त्याठिकाणी गेले असता तर त्याठिकाणी वाहून गेलेले दोघे नसून कडब्याची पोती असल्याचे आढळून आले.

२००५ मध्ये नौका दुर्घटना

राजापूर अकिवाट दरम्यान राजापुरातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळे हलविण्याचे प्रयत्न लष्करी जवान आपल्या नौकेतून करीत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास स्थलांतराची शेवटची खेप होती. दोन नौका जात होत्या.त्यातील एक नौका पाण्यात उलटली आणि बघता बघता १० जण महापुरात वाहून गेले होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र ५ जण बचावले. तर ५ जणांना महापुराने आपल्या कवेत घेतले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

२००६ मध्ये बैलगाडी दुर्घटना

२००६ मध्ये महापुरात बस्तवाडहून कुरुंदवाडकडे स्थलांतर होत असताना बस्तवाड येथील बैलगाडी पलटी होऊन बस्तवाड येथील ३ महिला, १ पुरुष आणि एक बालक अशा ५ जणांचा मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT