अहमदनगर

श्रीगोंदा शहर घेणार आता मोकळा श्वास; अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा

गेल्या एकवीस वर्षांपासून अस्तित्वात असलेली शहरातील मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणे आजपासून (दि.25) हटविण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दौंड – जामखेड महामार्गालगतची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली. नगरपालिकेने 24 एप्रिल रोजी जाहीर नोटिशीद्वारे शहरातील मुख्य रस्त्यालगतची जवळपास सव्वादोनशे अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी अतिक्रमणे हटविली.

उर्वरित अतिक्रमणे हटविण्यास नगरपालिकेने बुधवारी सकाळपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी शहरातून जाणार्‍या शिक्रापूर-जामखेड रस्त्यालगतच्या जकातेवस्ती परिसरातून ही कारवाई करण्यात आली. नगरपालिकेने आवाहन करूनही ज्यांनी अतिक्रमण हटविले नाही, त्यांची नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणे जेसीबी यंत्राच्या साहायाने जमीनदोस्त केली. या पुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगरपालिकने सांगितले आहे. अतिक्रमणधारकांनी कारवाई टाळण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरल्याचे पहायला मिळाले.

एका अतिक्रमणधारकाने एका बाजूने स्व. बाळासाहेब ठाकरे, तर दुसर्‍या बाजूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला होता. त्याचबरोबर एक ठिकाणी लावलेला झेंडाही चर्चेत राहिला. काहींनी कागदपत्रे दाखवून अतिक्रमणे वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रशासनाने सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, नगरपालिका कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

बेकायदा होर्डिंग स्टँडवर कारवाई कधी

शहरातील अतिक्रमणे हटविण्यासोबतच शहराच्या बहुतांश रस्त्यावर बेकायदा होर्डिंग स्टँड उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

एकवीस वर्षांनंतर अतिक्रमणांवर कारवाई

श्रीगोंदा शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. स्टँड परिसरातून झेंडा चौकात दुचाकीही जाऊ शकत नव्हती एवढे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. आज ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण विरोधात एकवीस वर्षांनंतर कारवाई करण्यात आली.

मुख्याधिकार्‍यांची धाडसी कारवाई

मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अतिक्रमण विरोधात ठोस भूमिका घेत आज कारवाईला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप दिले. राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे.

सरसकट कारवाई; सर्वांना समान न्याय

अतिक्रमण हटविण्याबाबत चर्चा सुरू झाल्यापासून मोठ्या लोकांना अभय मिळणार अशी शक्यता होती; मात्र पालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सरसकट कारवाई करत सर्वांना समान न्याय ही भूमिका बजावली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT