शेवगाव तालुक्यासाठी पोलिस ठाणे विभाजनाचा प्रस्ताव दाखल झाला असून, यात पूर्व आणी पश्चिम असे दोन पोलिस कार्यालय व 14 पोलिस अधिकारी आणि 140 पोलिस कर्मचारी असा आराखडा सादर झाला आहे. शेवगाव हा विस्तृत तालुका आहे. एक नगरपरिषद, 94 ग्रामपंचायती अशी 112 गावांतील 2011 जनगणनेनुसार 3 लाख 38 हजार 840 लोकसंख्या आज दहा वर्षांनंतर झपाट्याने वाढली आहे.
येथील पूर्वीची गुन्हेगारी पाहता महाराष्ट्रात खळबळ उडणारी घडली आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू तस्करांची दबंगगिरी येथे प्रख्यात आहे. त्याचबरोबर शहरात चौघांचे घडलेले हरवणे, हत्याकांड, त्यानंतर महिनाभरात दीपक गोर्डे, मंगल अळकुटे, बापू केसभट यांचे तिहेरी हत्याकांड,2 फेब्रुवारी 2015 रोजी झालेला दीपक कोलते या पोलिस कर्मचार्याचा खून, एकाच महिन्यात घडलेल्या 8 खुनांच्या घटना, चोर्या, दरोडे, रस्तालूट, पाकिटमारी, फसवणूक, वाद अशी गुन्हेगारी सतत घडत असताना येथील पोलिस बळ कमालीचे कमी असल्याने गुन्ह्यांचा तपास हा नापास होत राहिला.
विस्तृत तालुका व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता, या तालुक्यात दोन पोलिस ठाणी व्हावीत आणि परिपूर्ण कर्मचारी बळ मिळावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आता त्यास मुहूर्त मिळाला असून, शेवगाव पोलिस ठाण्याचे विभाजन करून पूर्व व पश्चिम अशा दोन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
यात पूर्व ठाण्यात 57 गावे आहेत. त्यासाठी 6 पोलिस अधिकारी व 70 पोलिस कर्मचारी, तर पश्चिम ठाण्यात शहरासह 38 गावे जोडली आहेत. त्यासाठी 8 अधिकारी व 70 पोलिस कर्मचारी प्रस्तावीत आहेत. दोन्ही ठाण्यांना फर्निचर, वेतन, भत्ता, वाहने आदींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पूर्व पोलिस ठाण्यास पूर्वीच्या दादेगाव रस्त्यावर असणार्या पोलिस उपविभागीय कार्यालयाशेजारील उपलब्ध 18 आर जागा आहे. पश्चिम ठाण्यास कार्यरत असलेले पोलिस ठाणे आणि जुन्या तहसील कार्यालयाची जागा आहे. येथे मजबूत लॉकरूम, शस्त्रगार अशा सुविधा उपलब्ध आहेत.
रेकॉर्ड रूम वगळता जुने तहसील कार्यालय जागा देण्यास तहसीलदारांनी समंतीपत्र दिले असून ही जागा पोलिस ठाण्यास वर्ग करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला आहे. सर्व पूर्तता झाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, गुन्हेगारी रोखण्यासाठी दोन पोलिस ठाण्याची गरज आहे.
विभाजनास तत्काळ मंजुरी द्यावी
वर्षांनुवर्षे वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी दोन स्वंतत्र पोलिस ठाणे व पुरेसे पोलिस बळ याचा विचार करता शेवगाव तालुक्याच्या पोलिस ठाणे विभाजनास सरकारने लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत असून, यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मत प्रदर्शित केले जात आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.