पुणे : राजगडावर सापडला शिवकालीन ठेवा; महिनाभरात अहवाल सादर होणार

राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील शिवकालीन शिवपट्टण परिसरात उत्खननात सापडलेल्या विविध बांधकामांचे अवशेष संरक्षित केले आहेत.
राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील शिवकालीन शिवपट्टण परिसरात उत्खननात सापडलेल्या विविध बांधकामांचे अवशेष संरक्षित केले आहेत.

दत्तात्रय नलावडे

वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवकालीन शिवपट्टणवाड्याच्या उत्खननाचा संशोधन अहवाल महिनाभरात येणार आहे. पुरातत्व खाते हा अहवाल शासनाला सादर करणार आहे.

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी 1648 ते 1672 पर्यंत राजगडावर होती. समुद्र किनारपट्टीपासून दक्षिणेत स्वराज्याचा मोठा विस्तार झाल्याने शिवरायांनी 1672 मध्ये राजधानी रायगडावर हलवली. रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे राजमाता जिजाऊ व राजपरिवाराचे निवासस्थान, स्वराज्याचे लष्करी व महत्त्वाचे केंद्र होते. शिवराय व राजपरिवाराचे निवासस्थान, लष्करी केंद्र व इतर महत्त्वाचे विभाग राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवपट्टण येथे असल्याचे उत्खननातून पुढे आले. उत्खननाचे काम 30 एप्रिल रोजी बंद केले. येथे सापडलेल्या अवशेषांवर प्लास्टिकचे झाकण टाकले आहे. तेथे चिखलमाती साठू नये, याची खबरदारी घेतली आहे. तसेच, पुरातत्व खात्याचे पाहरेकरी दादू वेगरे यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली आहे.

शिवकालीन ठेवा आला पुढे

राजगडाच्या पायथ्याला गुंजवणी नदीतीरावर शिवपट्टण या नावाने स्वराज्याचे प्रमुख केंद्र होते. येथे स्वतंत्र गावही होते. उत्खननातून राजगडाच्या इतिहासात प्रथमच मोठा शिवकालीन ठेवा पुढे आला आहे. यात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष, शिवराई नाणे, उखळ अशा वस्तूंसह चिरेबंदी दगड, विटा, कौले आदींचा समावेश आहे.

फळबागांच्याही पाऊलखुणा उजेडात

अनेक परकीयांच्या नोंदीत तसेच ऐतिहासिक कागदपत्रांत शिवपट्टण स्थळाचा उल्लेख आहे. त्यावरून शिवपट्टणवाडा स्थळाच्या उत्खननास दि. 3 मार्च 2022 रोजी सुरुवात झाली. दोन महिन्यांच्या उत्खननात अनेक वस्तू, बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. शिवपट्टण परिसरात भव्य वाडा, मध्यम आकाराची निवासस्थाने, चिरेबंदी दगड, विटांच्या भिंती, दगडी फरसबंदी, भूमिगत बांधकामे, स्वयंपाकघर आदी वास्तू सापडल्या. वाड्याच्या परिसरातील फळबागांच्याही पाऊलखुणा उजेडात आल्या आहेत.

शिवपट्टणवाड्याच्या उत्खननात अपेक्षेपेक्षा मोठा शिवकालीन ठेवा सापडला आहे. यात शिवकालीन भव्य व प्रशस्त वाड्याचे बांधकाम, तत्कालीन स्वच्छतागृहे, विटा, कौले, शिवराई नाणी, बहामनी नाणी आदींचा समावेश आहे. सध्या उत्खननाचा संशोधन अहवाल तयार केला जात असून, महिनाभरात अहवाल पूर्ण करून शासनाला सादर केला जाईल.

– विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व खाते, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news