

गुवाहाटी; पुढारी ऑनलाईन
संततधार पावसामुळे आसाममधील (Assam Floods) पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे २७ जिल्ह्यांतील ६.६२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काछार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था (शासकीय आणि खासगी) आणि अत्यावश्यक नसलेली खासगी आस्थापने ४८ तासांसाठी म्हणजेच १९ आणि २० मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आसाममधील पूरस्थिती बिघडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नागांव जिल्ह्यातील २.८८ लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नागांव जिल्ह्यातील १.१९ लाख, होजाईमधील १.०७ लाख, दरंगमधील ६० हजार, बिस्वनाथ येथील २७ हजार आणि उदलगुरी येथील १९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.
४८ हजारहून अधिक लोकांनी आसामच्या विविध जिल्ह्यांतील १३५ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. तर पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी राज्यभरात ११३ वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांना १५० कोटी रुपये मदत वितरीत केली आहे. तर केंद्राने पूर मदत उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यासाठी १ हजार कोटी मंजूर केले आहेत.
संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे आसाममधील बराक व्हॅली आणि दिमा हासाओ दरम्यानची रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. शेजारील त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या शेजारील राज्यांशी संपर्क तुटला आहे. हवाई दल दिमा हासाओ येथे पूरग्रस्तांना आवश्यक साहित्य पुरवत आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे की, पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि दळणवळण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी सुमारे ४५ दिवस लागतील. तर पुढील दोन-तीन दिवसांत रस्ते वाहतूक सुरू होईल.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये (Assam Floods) भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा दलाने बुधवारी सुमारे ८,०५४ लोकांना वाचवले. आसाम वन विभागाने काझीरंगा नॅशनल पार्क आणि इतर जंगलातील प्राण्यांना पुराच्या वेळी आश्रय देण्यासाठी सुमारे ४० उंच जागा (highlands) उभारल्या आहेत.