नगर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील कचरा घरोघर जाऊन गोळा करण्याचा ठेका संबंधित कंपनीला दिला आहे. मात्र, कचरा संकलन करणारी वाहने केवळ रस्त्याने फिरत असून, हॉटेल व दुकानदारांकडून पैसे घेत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. त्यावर अधिकारी निरूत्तर झाले. शहरात अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून कचर्याचे ढीग साचत आहेत. संबंधित कचरा संकलन करणार्यांना वारंवार सांगूनही ते ढीग आठ ते दहा दिवस पडून राहतात.
महापालिकेने संबंधित ठेकेदाराला घरोघर जाऊन कचरा संकलन करण्याचा ठेका दिला आहे. तसेच, कचर्याच्या वजनावर त्याला पैसे मिळतात. तरी सुद्धा कचर्याचे ढीग कसे साचून राहतात असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. सावेडी उपनगर, मुकुंदनगर, सिद्धार्थनगर, नालेगाव, सीनानदी काठ केडगाव, बुरूडगाव आदी परिसरात ठराविक ठिकाणी कचर्याचे ढीग सचलेले असतात. कचरा संकलन करणारी वाहने उपनगरातील मुख्य रस्त्यावरूनच कचरा संकलन करतात.
छोट्या कॉलनीमध्ये कचरा गोळा करणारी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून जात नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा आणून टाकतात. दुसरीकडे कचरा गोळा करणारी वाहने रस्त्यावरील हॉटेल, दुकानदार यांच्याकडून न चुकता कचरा संकलन करतात. कारण ते त्यांच्याकडून पैसे घेतात, असा आरोप नगरसेवकांनी स्थायी समिती सभेत केला. त्यावर अधिकार्यांनी या प्रकाराची रितसर चौकशी करून ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले.
कचरा संकलन करणार्या ठेकेदारांची माणसे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
नालेसफाई सुरू आहे पण, छोट्या गटारींचे काय? त्या गटारी पावसाळ्यात तुंबल्या की घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे मजूर नेमून छोट्या गटारी तत्काळ साफ करण्याचे काम हाती घ्या, अशीही सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या.