कोल्हापूर : परिख पुलाजवळ आणखी एक भुयारी रस्ता | पुढारी

कोल्हापूर : परिख पुलाजवळ आणखी एक भुयारी रस्ता

कोल्हापूर; सतीश सरीकर : रेल्वे स्टेशनमुळे कोल्हापूर शहराचा उत्तर-दक्षिण संपर्क तुटला आहे. जीर्ण झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या परिख पुलाखालून जीव मुठीत घेऊन कशीबशी वाहतूक सुरू आहे. एकमेव मार्ग असलेल्या या पुलाखाली वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. पावसाळ्यात तर अनेकवेळा वाहतूक बंद असते. परंतु आता ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. परिख पुलाजवळच आणखी एक भुयारी रस्ता तयार करण्याचा प्लॅन आखला आहे. रेल्वे प्रशासनाकडे त्यासंदर्भातील आराखडा मंजुरीसाठी पाठविला आहे. सुमारे दीडशे मीटर लांब आणि 33 फूट रुंंद असा रस्ता असून सुमारे 15 कोटी रु. खर्च अंदाजित आहे.

एस. टी. स्टँडजवळील महालक्ष्मी चेंबर्स ते साईक्स एक्स्टेंशन चौकाच्या अलीकडेपर्यंत सिंगल ट्रॅक भुयारी रस्ता असेल. दोन्ही बाजूने लाईट व्हेईकल ये-जा करू शकतील. त्याबरोबरच पादचार्‍यांना फूटपाथही धरण्यात आला आहे. पाच बंगला परिसराकडूनही एस. टी. स्टँडकडे येण्यासाठी रस्ता असेल. तसेच पाच बंगल्याकडून टाकाळा उड्डाणपुलाकडेही जाता येईल. त्यासाठी सध्या असलेल्या रस्त्याचा वापर करता येणार आहे. स्टँडवरून टाकाळा उड्डाणपुलाकडे जाणार्‍या वाहनांना परिख पुलाखालून जाता येणार आहे. महापालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट संदीप गुरव यांनी हा आराखडा तयार केला आहे.

शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परिख पूल रिनोव्हेशन ग्रुप स्थापन केला आहे. यात आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे व फिरोज शेख यांच्यासह इतरांचा समावेश आहे. ग्रुपमधील सदस्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे परिख पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत साकडे घातले. पालकमंत्री पाटील यांनीही पुढाकार घेत प्रशासन पातळीवर बैठका घेऊन महापालिका अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्यानुसार अधिकार्‍यांनी जाऊन सर्वेक्षण केले. नवीन भुयारी रस्ता व परिख पुलाचे रुंदीकरण झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. एस. टी. स्टँड व राजारामपुरी एकमेकांना जोडले जातील.

एस. टी. स्टँडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी परिख पुलाचे रुंदीकरण किंवा नवा भुयारी रस्ता आवश्यक आहे. त्यानुसार आराखडे तयार करून प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी जो मंजूर होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

मंजूर होईल त्या प्रस्तावाला निधी देऊ : पालकमंत्री पाटील

एस.टी. स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. स्टँडकडून राजारामपुरी परिसराकडे जाण्यासाठी फक्‍त परिख पुलाचाच आधार आहे. परिख पुलाचे रुंदीकरण किंवा नवीन भुयारी रस्ता झाल्यास कोल्हापूर शहराच्या उत्तर-दक्षिण बाजूची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून जो प्रस्ताव मंजूर केला जाईल, त्यासाठी निधी देऊ. रेल्वे प्रशासनासह राज्य शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

परिख पुलाच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव…

आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे व त्यांच्या सहकार्‍यांनी सध्या असलेल्या परिख पूल रुंदीकरणाचा आराखडाही तयार केला आहे. महापालिका प्रशासनाने हा आराखडाही रेल्वे प्रशासनाकडे पाठविला आहे. नव्या पुलाची रुंदी 25 मीटर असून लांबी 34 मीटर असेल. यात प्रत्येकी तीन मीटर रुंदीचे दोन रस्ते वाहनांना ये-जा करण्यासाठी असतील. त्याबरोबरच दुचाकीसाठी आणि सायकलसाठी ट्रॅक आहेत. पादचारी व अपंग बांधवांसाठीही फूटपाथ असेल. परिख पुलाच्या या रुंदीकरण आराखड्यासाठी सुमारे 15 कोटी खर्च अपेक्षित आहे.

Back to top button