Latest

हॉर्सरायडर श्रीया पुरंदरे हिची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

दीपक दि. भांदिगरे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय हॉर्सरायडर युवतीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी शहरातील नांदेड सिटी येथे घडला. श्रीया गणेश पुरंदरे (वय 17) असे आत्महत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. श्रीया पुरंदरे ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नात आहे.

श्रीया नांदेड सिटीतील इमारतीत राहत होती. तिच्या वडिलांची हॉर्सरायडिंगची अ‍ॅकॅडमी आहे. लहानपणापासूनच ती हॉर्सरायडिंगचे धडे घेत होती.

राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड सिटीमधील मधुवंती इमारतीच्या अकराव्या मजल्यावर श्रीया पुरंदरे राहत होती.

रविवारी सकाळी इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन काहीतरी वेगाने खाली पडल्याचा आवाज झाला होता. त्यानंतर चौकशी केली असता श्रीया पुरंदरे अकराव्या मजल्यावरुन खाली पडल्याचे दिसून आले होते.

तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने खळबळ उडाली आहे.

ती बारावीत शिकत होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

पहा व्हिडिओ : आधी कोरोना आणि आता महापुराने सगळा संसारचं उध्वस्त केला….

SCROLL FOR NEXT