कोल्हापूर : स्थलांतर नको; महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढा | पुढारी

कोल्हापूर : स्थलांतर नको; महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढा

कोल्हापूर; प्रवीण मस्के : महापुरामुळे न्यू पॅलेस परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात महापूर आल्यावर स्थलांतर करण्याची वेळ नागरिकांवर येते. नागरिकांचे स्थलांतर करण्यापेक्षा महापुराचे पाणी येऊ नये, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी भूमिका येथील नागरिकांची आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून न्यू पॅलेस परिसरात नागरिकांचे अनेक पिढ्यांचे वास्तव्य आहे. पाटोळे मळा, कसबेकर पार्क, नाईक मळा, पुंगावकर मळा, माळी मळा, इंगवले मळा, बेडेकर मळा त्याच्यापुढे रमण मळा, पोवार मळा आहे. येथे सुमारे 15 हजारांहून नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणी सामान्य नागरिक, शेतकरी राहतात.

1989, 2005, 2019, 2021 मध्ये येथे महापुराचे पाणी आले होते. 2005 च्या पुराने गल्ल्यांमध्ये पाणी आले नव्हते. मात्र, 2019 च्या महापुराचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदाच्या महापुरात 2019 पेक्षा वाईट स्थिती येथील नागरिकांनी अनुभवली. अनेकांच्या घरांत सात ते दहा फुटांवर पाणी होते. घरांतील प्रापंचिक साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत.

महानगर पालिकेच्या शाळेतदेखील पुराचे पाणी आल्याने शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे. शेतातील ऊस व इतर पिके पाण्यात असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शासनाने पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरवर्षी महापुराचे पाणी न्यू पॅलेस परिसरात येते. प्रशासनाने पावसाळा सुरू झाल्यावर महापूर येण्यापूर्वी भागातील नागरिकांना सूचना द्यावी. नागरिकांचे स्थलांतर करण्यापेक्षा महापुराचे पाणी भागात येऊ नये, यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात. म्हणजे, पुराच्या पाण्याने होणारे नुकसान टळेल.
– नितीन मोहिते, पानपट्टीचालक

न्यू पॅलेस परिसरातील पुंगावकर मळ्यात भाडेकरू म्हणून राहत असून घरकाम करून उपजीविका करीत आहे. पुराच्या पाणी आल्यावर घरातील साहित्य कोठे ठेवायचे, हा प्रश्न होता. आधीच कोरोना व महापूर यामुळे जगणे अवघड झाले आहे. याचा शासनाने विचार करावा. घरांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने भरपाई तत्काळ द्यावी.
– पुष्पा कांबळे, भाडेकरू महिला

एक-दोन वर्षांनी भागातील नागरिकांना महापुराचा त्रास सहन करावा लागत आहे. पुराच्या पाण्याबाबत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन उपाययोजना करावी. यावर्षी आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ नागरिकांना भरपाई देऊन शासनाने दिलासा द्यावा.
– प्रफुल्ल जांभळे, नागरिक

यावर्षी आलेल्या महापुरामुळे सामान्य नागरिकांसह सर्वच घटकांना मोठे नुकसान सोसावे लागलेे. याची राज्य पातळीवरून दखल घेऊन नागरिकांच्या हिताचा शासनाने विचार करावा. पुढील वर्षी पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार व्हावा.
– अजिंक्य गायकवाड, नोकरदार

Back to top button